जिल्ह्यातील १५६१ पैकी १२८४ गावांत कोरोनाचा शिरकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:14 AM2021-05-25T04:14:07+5:302021-05-25T04:14:07+5:30
अमरावती : कोरोनाचा संसर्ग शहरापेक्षा जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. १४ तालुक्यांतील अनेक गावांना कोरोनाने ...
अमरावती : कोरोनाचा संसर्ग शहरापेक्षा जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. १४ तालुक्यांतील अनेक गावांना कोरोनाने आपल्या कवेत घेतले आहे. जिल्ह्यातील १५६१ पैकी १२८४ गावांमध्ये कोरोनाने शिरकाव केला, तर २७७ गावांनी कोरोनाला रोखले आहे.
ग्रामीण भागात वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. पहिल्या लाटेत अमरावती शहरात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे शहरातील लोक गावाकडे धाव घेत होते. परंतु, आता दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागाला कोरोनाने विळखा घातला. ग्रामीण भागात लोक मोठ्या प्रमाणात एकत्र येत असल्याने आणि कोरोना संसर्ग रोखण्याचे नियम पाळत नसल्याचा हा परिणाम आहे.
मेळघाटात सुरुवातीला कोरोनाचा उद्रेक नव्हता. परंतु, होळीच्या सणानंतर चिखलदरा तालुक्यातील अनेक गावांत नवे कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागात २८७ ठिकाणे जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले. या ठिकाणी ये-जा करण्यास मनाई करण्यात आली आहे. जिल्ह्यातील वरूड, अचलपूर, मोर्शी आणि चांदूर बाजार तालुक्यांत सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी तीन तालुक्यांना मध्य प्रदेशची सीमा जुळली आहे. त्यामुळे तेथील लोकांचा या राज्यातील लोकांशी संपर्क येत असतो. याबाबत प्रशासनाच्यावतीने उपाययोजना केल्या जात आहेत.