कोरोनासारखीच लक्षणे; पॉझिटिव्ह ‘सारी, इली’ नमुन्यांची ‘जिनोम’ तपासणी; आरोग्य विभागाच्या सहसंचालकांच्या यंत्रणेला सूचना
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: December 20, 2023 07:22 PM2023-12-20T19:22:40+5:302023-12-20T19:23:02+5:30
या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागाने सूचना दिल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून कोरोनासारखेच लक्षणे असणाऱ्या ‘इली व सारी’च्या रुग्णांचे पॉझिटिव्ह नमुने चाचणीसाठी नागपूर येथे जनुकीय संरचना तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.
अमरावती : केरळमध्ये जेएन.१ या कोरोनाच्या व्हेरियंटची रुग्णसंख्या वाढत आहे व मंगळवारी ठाण्यातदेखील नोंद झालेली आहे. याच दरम्यान केरळ व कर्नाटकमध्ये पाच रुग्णांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागाने सूचना दिल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून कोरोनासारखेच लक्षणे असणाऱ्या ‘इली व सारी’च्या रुग्णांचे पॉझिटिव्ह नमुने चाचणीसाठी नागपूर येथे जनुकीय संरचना तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.
तसे आदेश पुणे येथील आरोग्य सहसंचालकांनी जिल्हा यंत्रणेला दिले आहे. त्या अनुषंगाने सुपर स्पेशॉलिटी व जिल्हा रुग्णालयातील काही रुग्णांचे नमुने ‘जिनोम सिक्वेसिंग’साठी पाठविण्यात आलेले आहे व आता रोज १० च्यावर नमुने विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरटीपीसीआर चाचणीसाठी येत असल्याची माहिती या विभागाने दिली. केरळ, कर्नाटकनंतर राज्यातदेखील या व्हेरियंटच्या रुग्णांची नोंद झालेली आहे. यापूर्वीच्या बीए.२.८६ पेक्षा सध्याचा जेएन.१ हा व्हेरियंट एक म्युटेशन जास्त असल्याचे आरोग्य यंत्रणेद्वारा सांगण्यात आले.