कोरोनापाठोपाठ आता डेंग्यूची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:11 AM2020-12-25T04:11:38+5:302020-12-25T04:11:38+5:30
आसेगाव पूर्णा : कोरोनाचे संकट कायम असताना आता डेंग्यूचे नवे संकट घोंघावत आहे. डेंग्यूचे रुग्ण सरकारी रुग्णालयात अजूनही येत ...
आसेगाव पूर्णा : कोरोनाचे संकट कायम असताना आता डेंग्यूचे नवे संकट घोंघावत आहे. डेंग्यूचे रुग्ण सरकारी रुग्णालयात अजूनही येत नसले तरी खासगी रुग्णालयात ते आढळत आहेत. सध्या बदलत्या वातावरणामुळे डासांचा प्रादुर्भाव सगळीकडेच वाढला आहे. त्याचा परिणाम म्हणून हिवताप अथवा डेंग्यूसदृश आजाराचे रुग्णही आढळत आहेत. अनेकांना या आजारामुळे खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र, आसेगाव पूर्णा अंतर्गत येणाऱ्या आसेगाव व टाकरखेडा पूर्णा येथे दोन आठवड्यांत अंदाजे १० ते १५ च्या जवळपास डेंग्यूसदृश रुग्णांनी परतवाडा येथे खासगी दवाखान्यांत उपचार घेतल्याचे समजते. एका स्थानिक डॉक्टररांनीसुद्धा आपण बऱ्याच डेंग्यूसदृश रुग्णांवर उपचार केल्याचे सांगितले. स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णांवर उपचार होत नसल्याची ओरड आहे. सद्यस्थिती परिसरात डेंग्यूच्या रुग्णांत वाढ होत असून, रुग्ण खासगी रुग्णालयाकडे धाव घेत आहे.
कोट
प्राथमिक आरोग्य केंद्रात काही लक्षणे असलेली रुग्ण येतात. मात्र, डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्ण आलेला नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रांत डेंग्यू रुग्णांवर उपचारासाठी लागणारी औषधी आहे.
- समीना खान,
वैद्यकीय अधिकारी, पीएचसी, आसेगाव पूर्णा