Corona Virus in Amravati; मेळघाटच्या सीमेवर आढळला कोरोना पॉझिटिव्ह; सर्वत्र खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 08:46 PM2020-04-06T20:46:54+5:302020-04-06T21:35:09+5:30
मेळघाटच्या सीमारेषेवरील मध्यप्रदेशच्या बैतूल तालुक्यातील भैसदेही येथील एक इसम कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. भोपाळ येथील वैद्यकीय प्रयोगशाळेतून सोमवारी दुपारी तो अहवाल बैतूल आरोग्य प्रशासनाला प्राप्त झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मेळघाटच्या सीमारेषेवरील मध्यप्रदेशच्या बैतूल तालुक्यातील भैसदेही येथील एक इसम कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. भोपाळ येथील वैद्यकीय प्रयोगशाळेतून सोमवारी दुपारी तो अहवाल बैतूल आरोग्य प्रशासनाला प्राप्त झाला. त्यानंतर मध्यप्रदेश प्रशासनाने भैसदेही येथील ती व्यक्ती राहत असलेला संपूर्ण परिसर सील केला आहे. भैसदेही शहर मेळघाटातील अनेक आदिवासी खेड्यांना लागून असल्याने स्थानिक परिसरात खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील काटकुंभ, चुरणी, जारिदा परिसरातील २५ पेक्षा अधिक आदिवासी पाड्यातील नागरिक दैनंदिन गरजेसाठी लागणाऱ्या वस्तू खरेदीकरिता भैसदेही येथे जातात. संपूर्ण भारतभर 'लॉकडाऊन' झाल्यावर या परिसरातील पालेभाजी विक्रेता व किराणा व्यावसायिक या भागात ये-जा करतात. विशिष्ट समुदायातील नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने मेळघाटातील या भागात दहशत पसरली आहे.
नागपूर येथून आला होता युवक
तो युवक काही दिवसांपूर्वी नागपूरहून भैसदेही येथे परतला होता. त्याचा कोरोनाबाबतचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यादृष्टीने परिसरात कर्फ्यू लावण्यात आला. परिसर पूर्णत: सील करण्यात आल्याचे बैतूलचे जिल्हाधिकारी राकेश सिंग यांनी 'लोकमत'ला सांगितले.
जिल्ह्यातील एका युवकाचा अहवाल कोविड-१९ पॉझिटिव्ह आला आहे. तो युवक भैसदेही येथील आहे. संपूर्ण परिसर सील करून सॅनिटाईज्ड केला जात आहे.
- गिरीश चौरसिया,
जिल्हा आरोग्य अधिकारी, बैतूल