कोरोनामुळे अनाथ ११ बालकांना अर्थसहाय्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:10 AM2021-06-23T04:10:28+5:302021-06-23T04:10:28+5:30
अमरावती : कोरोनामुळे अनाथ झालेल्या ११ बालकांना आता पाच लाखांचा लाभ मिळणार आहे. त्याच्या नावे ही रक्कम ठेवी स्वरूपात ...
अमरावती : कोरोनामुळे अनाथ झालेल्या ११ बालकांना आता पाच लाखांचा लाभ मिळणार आहे. त्याच्या नावे ही रक्कम ठेवी स्वरूपात राहील व २१ वर्षांचा झाल्यावर त्याला या रकमेचा लाभ मिळणार आहे. याशिवाय ११०० रुपयांच्या बालसंगोपन योजनेचा लाभ देखील या बालकांना मिळणार आहे. याविषयी शासनादेश प्राप्त झाल्याचे महिला व बाल विकास अधिकारी अतुल भडांगे यांनी सोमवारी सांगितले.
कोरोनामुळे अनाथ झालेल्या १८ वर्षांआतील बालकांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे या बालकांना पाच लाखांपर्यंतचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय टास्क फोर्सने ही बालके शोधून काढली. १ मार्च २०२० व त्यानंतर कोरोनामुळे दोन्ही मात-पिता गमाविलेली ही बालके आहेत. या मुलांचे संगोपन करण्यास कुणीही तयार नसल्यास त्यांना बालगृहात दाखल करण्यात येणार आहे. यात जिल्ह्यात एका बालकाला देसाई चौकातील बाल संगोपनगृहात दाखल करण्यात आलेले आहे. याशिवाय १० बालकांना त्यांच्या नातेवाईकांनी सहारा दिलेला आहे. याशिवाय एक पालक गमावलेल्या २०० बालकांना १,१०० रुपयांचे दरमहा अर्थसहाय्य मिळणार आहे. बालसंगोपन योजनेंतर्गत मिळणाऱ्या रकमेचा वापर त्यांचे सध्याचे पालक शैक्षणिक व वैद्यकीय कारणांसाठी करू शकणार आहे.
बॉक्स
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत टास्क फोर्स
न्यायालयाचे आदेशाने जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत टास्क फोर्स गठित करण्यात आला आहे. यात कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांची माहिती संकलित करणे, त्यांना सर्वतोपरी संरक्षण उपलब्ध करणे, अशी बालके बाल कामगार, अनैतिक मानवी वाहतूक, मानवी तस्करी याला बळी पडणार नाही, याची काळजी घेणे, यासह अन्य जबाबदारी पार पाडत आहेत.