कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवताना सूक्ष्म नियोजन आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:13 AM2021-05-18T04:13:05+5:302021-05-18T04:13:05+5:30

अमरावती : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविताना गावांमध्ये सूक्ष्म नियोजनासह अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. उपचार सुविधा वाढविण्याबरोबरच प्रभावी देखरेख, ...

Corona requires meticulous planning when implementing preventive measures | कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवताना सूक्ष्म नियोजन आवश्यक

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवताना सूक्ष्म नियोजन आवश्यक

Next

अमरावती : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविताना गावांमध्ये सूक्ष्म नियोजनासह अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. उपचार सुविधा वाढविण्याबरोबरच प्रभावी देखरेख, सातत्यपूर्ण समन्वय व जनजागृती याद्वारे ग्रामस्तरीय समित्यांनी कोरोना साथ नियंत्रणासाठी प्रयत्न करावे, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी रविवारी दिले.

कोरोना उपाययोजनांच्या अनुषंगाने तालुकानिहाय आढावा घेण्यासाठी आयोजित ऑनलाईन बैठकीत पालकमंत्री बोलत होत्या. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांच्यासह उपविभागीय अधिकारी व तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, पोलीस निरीक्षक, ग्रामसेवक, तलाठी, ग्रामस्तरीय कोरोना प्रतिबंधक समिती सदस्य हे उपस्थित होते. अमरावती, चांदूर रेल्वे, अंजनगाव सुर्जी, मोर्शी या चार तालुक्यांतील समित्यांच्या आढावा त्यांनी यावेळी घेतला. कोरोना साथ नियंत्रणासाठी ग्रामस्तरीय समित्यांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. सगळ्या यंत्रणांनी साथ नियंत्रणासाठी समन्वय ठेवून एकत्रित प्रयत्न करावेत. तालुकास्तरीय समित्यांनी या कामांचा रोज आढावा घेणे गरजेचे आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान बालके बाधित झाल्यास, त्यांना आवश्यक ते उपचार वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्यावतीने नियोजन करण्यात येत आहे. बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे. याद्वारे लहान मुलांवरील उपचाराबाबत मार्गदर्शन, प्रतिबंधात्मक औषधे, आवश्यक साधनसामग्री व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्याबाबत तयारी करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे म्युकरमायकोसिस रोगाचा प्रादुर्भाव कोरोना रुग्णांमध्ये वाढत आहे. जिल्हास्तरावर या दोहोंसाठी स्वतंत्र वॉर्ड निर्माण केले जात आहेत. आवश्यक औषधसाठा व उपचार सामग्री उपलब्ध करून दिली जात आहे.

ग्रामीण भागात अद्यापही संसर्ग वाढत आहे. त्यामुळे सर्व नियमांचे पालन प्रत्येकाकडून होणे आवश्यक आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यातील निर्बंध २२ मेपर्यंत वाढवण्यात आले आहेत. नियमांचे काटेकोर पालन होण्यासाठी ग्रामस्तरीय समित्यांनी प्रभावी देखरेख करावी. आवश्यक तिथे ग्रामीण पोलिसांचे सहकार्य घ्यावे. कोरोना नियंत्रणासाठी नागरिकांनी स्वतःहून निर्बंधांचे पालन करणे आवश्यक आहे. यासाठी व्यापक जनजागृती करावी. कोरोना प्रतिबंधासाठी नागरिकांना आवश्यक मार्गदर्शक सूचना, त्रिसूत्रीचे पालन, अन्य आवश्यक नियमांचे पालन, रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आहार पद्धती आदी जनजागृतीवर भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

बॉक्स १

आवश्यक तिथे आरोग्य सुविधा वाढवा

आवश्यक तिथे आरोग्य सुविधा वाढविण्याबाबत तात्काळ जिल्हा प्रशासनाला माहिती द्यावी. आवश्यकतेनुसार ऑक्सिजन पुरवठा, बेड उपलब्धता, रेमडेसिविर इंजेक्शन तसेच म्युकरमायकोसिस आजारावरील औषधसाठा, लहान बालकांसाठी आवश्यक औषधसाठा तसेच वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रशासनाने परिपूर्ण तयारी करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

बॉक्स २

उपलब्धतेनुसार सर्वांना लस

कोरोना नियंत्रणासाठी 'ब्रेक द चेन'च्या आदेशाचे तंतोतंत पालन व्हायला हवे. सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्या तसेच विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करा. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पोलीस विभागाने निर्बंधांची कडक अंमलबजावणी करावी. विशेषतः गृह विलगीकरणातील व्यक्तींकडून नियमभंग होऊ नये, यासाठी कसोशीने देखरेख करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीने ४५ वर्षांवरील अधिकाधिक नागरिकांना लस देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. उपलब्धतेनुसार सर्वांना लस मिळणार आहे. त्यानुसार लसीकरणासाठी योग्य नियोजन होणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Corona requires meticulous planning when implementing preventive measures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.