पोळा सणावर यंदा कोरोनाचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 05:00 AM2020-08-18T05:00:00+5:302020-08-18T05:00:07+5:30
खांदेमळणी आणि पोळयाच्या दिवशी वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलजोडीला केवळ विश्रांतीच नव्हे, तर या दिवशी त्यांना शेतकरी पुरणपोळीसारखे गोडधोड पदार्थ खाऊ घालतात. या सणाला बैलाच्या शिंगांना रंग लावून, पाठीवर झूल पांघरून सजवले जाते. त्यांच्या नाकात नवीन वेसण आणि बांधण्यासाठी नवीन दोर खरेदी केले जातात.
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूरबाजार : यंदा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने पोळा साजरा करण्याबाबत प्रशासनाने काही बंधने घातली आहेत. तरीही शहरातील विविध भागांत बैलांच्या सजावटीच्या साहित्याची दुकाने सजली आहेत. हे साहित्य खरेदीसाठी शेतकऱ्यांनी बाजारात गर्दी केली आहे.
खांदेमळणी आणि पोळयाच्या दिवशी वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलजोडीला केवळ विश्रांतीच नव्हे, तर या दिवशी त्यांना शेतकरी पुरणपोळीसारखे गोडधोड पदार्थ खाऊ घालतात. या सणाला बैलाच्या शिंगांना रंग लावून, पाठीवर झूल पांघरून सजवले जाते. त्यांच्या नाकात नवीन वेसण आणि बांधण्यासाठी नवीन दोर खरेदी केले जातात. या सर्व बैल सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी बाजारात गर्दी केली आहे. मात्र, यंदा कोरोना विषाणूचा संसर्ग ग्रामीण भागात सातत्याने वाढत असल्याने प्रशासनाने पोळा सण सामूहिकरीत्या साजरा करण्यावर बंदी घातली आहे. मात्र, यंदा पावसाने वेळोवेळी हजेरी लावल्याने पीक परिस्थिती चांगली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पोळा सणाच्या निमित्ताने बैलांच्या सजावटीचे साहित्य घेण्यासाठी शेतकºयांमध्ये मोठा उत्साह आहे.
दरवर्षी पोळ्याच्या पाच दिवस आधी शेतकरी बाजारपेठेतच साहित्य खरेदी करताना दिसतात. या बैलजोडीच्या गळ्यातील वेगवेगळ्या प्रकारच्या माळा, घुंगरू, घुंगरपट्टा आदी वस्तूंचे विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. बैलजोडीसाठी फॅन्सी वस्तंूची विक्रीसुद्धा मोठ्या प्रमाणात होत असल्याचे एका दुकानदाराने सांगितले. बैलाच्या अंगावरीस झूल ७०० ते ९०० रुपयांपर्यंत विक्रीला आहे. बैलजोडीच्या सजावटीचे साहित्य यंदा १० ते १५ टक्क्यांनी वाढले आहे. मंगळवारी मोठा, तर बुधवारी तान्हा पोळा आहे. मोठ्या पोळ्याप्रमाणेच तान्हा पोळ्याची उत्सुकता लहान मुलांमध्ये अधिक असते. यासाठी लाकडी बैलासह मातीचे लहान बैल मोठ्या प्रमाणात बाजारात विक्रीला आले आहेत.
वरूडात पोळ्याचे तोरण तुटणार नाही
वरूड/ शेंदूरजनाघाट : शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात मानाचा पोळा सण भरविला जातो. मात्र, कोरोनामुळे शेकडो वर्षांच्या परंपरेला यंदा फाटा दिला जाणार आहे. यंदा शेतकरी पोळ्यात बैलजोडी नेणार नसून, घरीच पूजा करावी लागणार आहे. मानाचे तोरण तोडणाºयांनासुद्धा कोरोनाचा फटका बसणार आहे. पोळा सार्वजनिक स्वरूपात साजरा करू नये, यासाठी प्रशासनाने गावोगावी सूचना दिल्या आहेत. शेंदूरजनाघाटच्या पोळा बाजारातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल व्हायची. तो पोळ्याच्या पूर्वसंध्येला भरणारा बाजार यंदा भरला नाही.