बँकांमधूनही कोरोनाचा फैलाव, गर्दी आवरेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:12 AM2021-05-08T04:12:45+5:302021-05-08T04:12:45+5:30
त्रिसूत्रीचे पालन नाही, सुरक्षित अंतराचा फज्जा, सॅनिटायझर, हॅन्डवाॅशची सुविधा गायब अमरावती : कोरोना विषाणूची साखळी रोखण्यासाठी प्रशासनातर्फे कडक निर्बंध ...
त्रिसूत्रीचे पालन नाही, सुरक्षित अंतराचा फज्जा, सॅनिटायझर, हॅन्डवाॅशची सुविधा गायब
अमरावती : कोरोना विषाणूची साखळी रोखण्यासाठी प्रशासनातर्फे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. मात्र, बँकांमध्ये जुजबी कामांसाठीसुद्धा नागरिकांची प्रचंड गर्दी होत असून, ही गर्दी कोरोना संसर्गाचा फैलावासाठी पोषक ठरत आहे. गर्दीला आवर घालण्यासाठी बँकांकडे पुरेशी व्यवस्था नाही. बहुतांश बँकांमध्ये कोरोना नियमावलींचे पालन होत नसल्याचे वास्तव आहे.
कोरोनाकाळात आर्थिक व्यवहार हे ऑनलाईन करावे, अशी गाईड लाईन आहे. मात्र, निमशासकीय, खासगी, सहकारी बँकांमध्ये नागरिकांची अनावश्यक कामांसाठी गर्दी ही नित्याचीच बाब झाली आहे. शासन, प्रशासन स्तरावरून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, मे महिन्यात विधवा, परित्यक्ता, अपंग, निराधार योजनेच्या लाभार्थींची बँकांमध्ये प्रचंड गर्दी वाढत आहे. यात पासबुक अपडेट करण्यासाठी बँकेत रांगा लागत आहेत. रेटारेटी, सुरक्षित अंतराचा अभाव, मास्कचा वापर नाही, सुरक्षा रक्षकांकडून न होणारी आडकाठी यामुळे बँकांमध्ये कोणीही यावे आणि काम करून जावे, असा प्रकार सुरू आहे. हल्ली कोरोना संसर्गाची स्थिती बघता, बँकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर अधिकारी, कर्मचारी वा ग्राहक यांची थर्मल स्क्रीनिंग, ऑक्सिजन तपासणी, सॅनिटायझर लावल्याशिवाय प्रवेश देऊ नये, अशी ताकीद दिली जाते. दुसरीकडे बँकेच्या बाहेर कोरोना रोखण्यासाठी कोणत्याही प्रकारची सुविधा नाहीत, असा अनुभव शुक्रवारी ‘लोकमत’च्या निदर्शनास आला.
-------------------
अनुदान थेट खात्यात तरीही गर्दी
केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचे अनुदान हे डीबीटीद्वारे लाभार्थींच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. खातेदारांना मोबाईलवर मॅसेज दिला जातो. असे असताना काही लाभार्थी बँकांमध्ये अनावश्यक गर्दी करीत आहेत. ही बाब कोरोना संसर्गाच्या वाढीस पोषक ठरणारी आहे तसेच ड्राफ्ट स्कॅनिंगलाही गर्दी होत आहे.
------------------
कोट
ज्या लाभार्थीकडे एटीएम नाही, अशा खातेदारांनाच बँकेत प्रवेश द्यावा, अशी कोरोना काळातील नियमावली आहे. मात्र, नागरिक अनावश्यक गर्दी करतात. वारंवार सांगूनही बँकेत येतात. सुरक्षा रक्षकांशी वाद घालतात. कोरोनामुळे आतापर्यंत बँकेतील सात कर्मचारी संक्रमित आढळून आले आहेत. नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी.
- अनिल गचके, प्रबंधक, भारतीय स्टेट बँक, बियाणी शाखा, अमरावती
-----------------
कोरोनामुळे ५० टक्के कर्मचारी बँकेत कर्तव्यावर येत आहे. बँकेच्या प्रबंधकांना कोरोना संसर्ग राेखण्यासाठी सॅनिटायझर, हँडवॉशची सुविधा, शारीरिक अंतराबाबत कळविले आहे. गर्दी होऊ नये, यासाठी कठोर नियमांचे पालन करण्यासाठी सूचना दिल्या जातील.
- जितेंद्र झा, अग्रणी बँक, अमरावती