ग्रामीण भागात कोरोना सुसाट; काँटॅक्ट ट्रेसिंग नावालाच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 05:00 AM2021-04-22T05:00:00+5:302021-04-22T05:00:48+5:30
ग्रामीण भागात कोरोना चाचणीवर मर्यादा असून रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांची ट्रेसिंग करण्याचे प्रमाणही कमी असल्याने कोरोना वेगाने वाढतो आहे. टेस्टिंग, टेसिंग ट्रीटमेंट अशी त्रिसूत्री कोरोनावर मात करण्यासाठी असली तरी शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा तोकडी पडत आहे. परिणामी कोरोना रुग्ण वाढल्यानंतरही पाहिजे त्या प्रमाणात नियंत्रण दिसत नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोनाची स्थिती शहरापेक्षा ग्रामीण भागात दिवसेंदिवस अधिक बिकट होत चालली आहे. गावांमध्ये होम आयसोलेशन शहरांमध्ये कोरोना चाचणीसाठी विशेष तपासणी मोहीम राबविली जात असून शहरात महापालिकेने फिरते पथकही सुरू केले आहेत. ग्रामीण भागात कोरोना चाचणीवर मर्यादा असून रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांची ट्रेसिंग करण्याचे प्रमाणही कमी असल्याने कोरोना वेगाने वाढतो आहे. टेस्टिंग, टेसिंग ट्रीटमेंट अशी त्रिसूत्री कोरोनावर मात करण्यासाठी असली तरी शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा तोकडी पडत आहे. परिणामी कोरोना रुग्ण वाढल्यानंतरही पाहिजे त्या प्रमाणात नियंत्रण दिसत नाही. ग्रामीण भागांमध्ये मास्क, सोशल डिस्टन्स आणि हॅण्ड सॅनिटायझर या त्रिसूचा वापर आजही पाहिजे त्या प्रमाणात होत नाही. यामुळे ग्रामीण भागात वेगाने पसरणाऱ्या कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी आरोग्य विभागाला कठोर पावले उचलावी लागणार आहेत.
गावामध्ये यांचा ‘वाॅच’ अपेक्षित
जिल्हा आणि तालुका प्रमाणेच गावस्तरावरही कोरोना नियंत्रण दक्षता समिती आहे. समितीमध्ये सरपंच, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल यांचा समावेश आहे. ही समिती बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांनवर वॉच ठेवण्याचे काम करते. याशिवाय आरोग्य कर्मचारी व आशा सेविका यांच्यामार्फत नियंत्रण ठेवावे.
कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवण्याची गरज
गावस्तरावर एखादी व्यक्ती पॉझिटिव्ह आल्यास अशा ठिकाणी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात येते. तालुका आरोग्य अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी तपासणी मोहीम पूर्ण करताना आरोग्य विभागाची यंत्रणा कमी पडत आहे. त्यामुळे मनुष्यबळ वाढविणे गरजेचे आहे.
ग्रामीण भागात कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या वाढत असली तरी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनासाठी आरोग्य विभागाकडून आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. कॉन्टॅक्ट टेसिंग, काेविड केअर सेंटरमध्येही दाखल केले जात आहे. होमआयसोलेशन रुग्णावरही आरोग्य विभागाकडून लक्ष ठेवले जात आहे.
- डॉ. दिलीप रणमले, जिल्हा आरोग्य अधिकारी