सर्व आस्थापनांच्या कर्मचा-यांची कोरोना चाचणी बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:08 AM2021-02-19T04:08:24+5:302021-02-19T04:08:24+5:30
अमरावती : जिल्ह्यात कोरोनाची पूर्ववत परिस्थिती निर्माण होऊन पुन्हा लॉकडाऊन करण्याशिवाय प्रशासनाला पर्याय राहणार नाही. कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना आणखी ...
अमरावती : जिल्ह्यात कोरोनाची पूर्ववत परिस्थिती निर्माण होऊन पुन्हा लॉकडाऊन करण्याशिवाय प्रशासनाला पर्याय राहणार नाही. कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना आणखी कठोर होऊ नये, यासाठी सर्व नागरिकांनी ‘कोविड आप्रोप्रिएट बिहेविअर’चे काटेकोर पालन करावे व सर्व आस्थापनांनी त्यांच्या सर्व कर्मचा-यांची कोरोना चाचणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी बुधवारी रात्री उशिरा दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवनात जिल्ह्यातील सर्व व्यापारी अशोसिएशन, ऑटोचालक, दुकाने, हॉकर्स, खासगी वाहतूक संघटनांच्या पदाधिका-यांची बैठकीत प्रतिबंधात्मक आदेशासंदर्भात माहिती देण्यात आली. यावेळी महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, पोलीस उपायुक्त शशिकांत सातव, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, मनपा उपायुक्त रवि पवार यांच्यासह विविध संघटनेचे पदाधिकारी व प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
लक्षणे नसलेल्या व गृह विलगीकरणात असलेल्या व्यक्तींकडून अनेकदा नियम पाळले जात नाहीत. अशांकडून संक्रमणाचा धोका वाढतो. त्यामुळे त्यांच्यावर कडक दंडात्मक कार्यवाही व्हावी. या व्यक्तींशी संबंधित यंत्रणेने नियमित संपर्क ठेवावा. त्यांच्यावर घरावर ठळक अक्षरात फलक लावून कुटूंबातील सर्व सदस्यांची तत्काळ कोरोना चाचणीसाठी तजवीज करावी. गृह विलगीकरणाचे नियम न पाळणाºयांकडून बंधपत्र लिहून घ्यावे. एवढे केल्यावर ऐकून न घेता उल्लंघन करतांना दुस-यांदा आढळून आल्यास त्याच्याकडून २५ हजार दंड वसूल करण्यात येईल. तसेच संबंधिताच्या मालमत्ता करमध्ये दंड नमूद केल्या जावून वसूल केल्या जाईल. त्याचे काटेकोर पालन होत नसल्यास किंवा संबंधितांनी यासाठी नकार दिल्यास त्यांना कोविड सेंटरला भरती करावे. घरोघरी जाऊन सर्वेक्षण करुन कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर द्यावा, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
बॉक्स
जोखमीच्या क्षेत्रांत चाचण्या अन् सर्वेक्षण
केंद्रीय पथकाने बुधवारी भेट दिली व काही जोखमीची क्षेत्रे आढळून आल्याचे निरीक्षण नोंदविले. त्यांच्या सूचनेनुसार अशा परिसरात रॅपिड अॅन्टिजेन चाचण्यांचे प्रमाण वाढविणे व गृहभेटींतून सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. मास्क, सोशल डिस्टन्स व स्वच्छतेचे नियम न पाळणाºयांवर दंडात्मक कार्यवाहीसाठी पथके गठित करण्यात आली आहेत.
बॉक्स
दोन-तीन दिवसांत पुणे लॅबचा अहवाल
हवामान बदल, वाढती थंडी यामुळे रुग्ण संख्या वाढीचे कारण सांगितले जाते. संसर्ग हा एकदुस-यापुरता मर्यादित न राहता अख्खे कुटुंब संक्रमित झाल्याचेही दिसून येत आहे. विषाणूच्या संसर्गक्षमतेत वाढ आदी शास्त्रीय कारणे जाणून घेण्यासाठी काही नमुने पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेला पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल दोन- तीन दिवसांत प्राप्त होईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले.