परतवाड्यात परवानगी नसलेल्या लॅबमध्ये कोरोना टेस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:14 AM2021-02-25T04:14:26+5:302021-02-25T04:14:26+5:30
(फोटो) प्रशासनाचे दुर्लक्ष, आता कोरोनाग्रस्ताची गोळाबेरीज अनिल कडू परतवाडा : कोरोनाच्या अनुषंगाने रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट करण्याची परवानगी रद्द करण्यात ...
(फोटो)
प्रशासनाचे दुर्लक्ष, आता कोरोनाग्रस्ताची गोळाबेरीज
अनिल कडू
परतवाडा : कोरोनाच्या अनुषंगाने रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट करण्याची परवानगी रद्द करण्यात आल्यानंतरही परतवाड्यातील एका खासगी पॅथॉलॉजी लॅबमध्ये आजही रॅपीड ॲन्टिजेन टेस्ट केली जात आहे.
परवानगी रद्द केली गेलेली ही लॅब प्रशासनाला अहवालदेखील पाठवत आहे. यावर प्रशासन कोरोनारुग्णांची गोळाबेरीज करण्यात व्यस्त आहे. या सर्व प्रकारांची माहिती असूनही ही बाब प्रशासनाकडून दुर्लक्षित आहे.
कोरोनाच्या अनुषंगाने परतवाड्यातील पाच खाजगी पॅथॉलॉजी लॅबना रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट करण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाने दिली होती. पण, अचलपूर तालुक्यासह नगरपालिका क्षेत्रातील कोरोनाच्या उद्रेकानंतर कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव बघता, उडालेल्या गोंधळामुळे ही परवानगी जिल्हा प्रशासनाने रद्द केली.
जिल्हाधिकाऱ्यांच्या १७ फेब्रुवारीच्या सूचनेनुसार, जिल्हा शल्यचिकित्सक यांनी आपल्या १८ फेब्रुवारीच्या पत्रान्वये परवानगी रद्दचे आदेश निर्गमित केलेत. यात २० फेब्रुवारीपासून रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट करण्याकरिता दिलेली परवानगी रद्द करण्यात येत असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांनी ‘शेरा’ या रकाण्यात स्पष्ट केले.
रॅपिड ॲन्टिजेन टेस्टची परवानगी रद्द केलेल्या परतवाड्यातील या तीन खासगी पॅथॉलॉजी लॅबमध्ये डॉ. खुशबू बरडिया, डॉ. विशाखा चंदनानी आणि डॉ. ओ.आर. बोहरा यांच्या लॅबचा समावेश आहे. २० फेब्रुवारीपासून परवानगी रद्द केली गेली असली तरी यातील डॉ.खुशबु बरडीया यांच्या लॅबकडील २२ फेब्रुवारी आणि २३ फेब्रुवारीच्या तारखेतील अहवाल स्थानिक प्रशासनाकडे उपलब्ध आहेत. यातील रुग्णांना डॉ. कमल अग्रवाल आणि डॉ. राम तेजवाणी यांनी रेफर केल्याचे अहवालावर नमूद असून, हे सर्व अहवाल पॉझिटिव्ह आहेत.
परतवाडा शहरातील डॉ. समिता चित्रकार आणि डॉ.आर.टी.भन्साली यांच्या खासगी लॅबला कोविड-१९ ची चाचणी करण्याची परवानगी मात्र कायम ठेवण्यात आली आहे. ही परवानगी कायम ठेवताना, दाखल किंवा आपत्कालीन रुग्ण, ज्यांना तातडीच्या सेवेची गरज आहे, अशांचीच रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट करायची आहे. यात बाळंतपण, ऑपरेशन, ॲक्सिडेंट व अतिगंभीर रुग्णांचा समावेश आहे. बाह्यरुग्ण विभागातील रुग्णांना फक्त आरटी-पीसीआरकरिता संदर्भित करण्याचे निर्देश आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या अटी व शर्ती दिल्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांनी आपल्या १८ फेब्रुवारीच्या परवानगी कायम ठेवण्याच्या पत्रात म्हटले आहे. असे असले तरी परवानगी कायम असलेल्या परतवाड्यातील या दोन खाजगी पॅथॉलॉजी लॅबमध्ये सरसकट सर्वांच्याच रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट केल्या जात आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या अटी व शर्तीकडे दुर्लक्ष करून केल्या जात असलेल्या या रॅपीड ॲन्टिजेन टेस्टचे अहवालही प्रशासनाकडे उपलब्ध आहेत.