कोरोना बळी, ४०० चे दारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:10 AM2021-01-04T04:10:55+5:302021-01-04T04:10:55+5:30
अमरावती : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे पहिल्या रुग्णाच्या मृत्यूला सोमवारी १० महिने पूर्ण झाले. या कालावधीत कोरोनाचे बळींची संख्या ३९८ ...
अमरावती : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे पहिल्या रुग्णाच्या मृत्यूला सोमवारी १० महिने पूर्ण झाले. या कालावधीत कोरोनाचे बळींची संख्या ३९८ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात संक्रमितांचा मृत्यूदर दोन टक्क्यावर स्थिरावल्याने चिंतेत भर पडली आहे.
कोरोनाच्या पक्ल्याला रुग्णाची नोंद येथील हाथीपुरा भागात झाली व हा रुग्ण ‘होमडेथ’ असल्याने पहिल्या संक्रमिताची नोंद ४ एप्रिल रोजी झालेली आहे. या १० महिन्यांच्या कालावधीत कोमार्बिड रुग्णांचे सातत्याने मृत्यू होत आहेत. यात ८० टक्के रुग्ण ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यंना कोरोना संसर्गासह इतरही आजार असल्याचे आरोग्य विभागाचे ‘डेथऑडिट’मध्ये स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे कोरोनाचे सर्वाधिक बळी ५० ते ६० वर्षे वयोगटातील असल्याचा आरोग्य विभागाचा अहवाल असल्याने या वयोगटातील रुग्णांची व व्यक्तींनीही काळजी घेणे महत्त्वाचे ठरत आहे.
मुळात कोरोनाचा विषाणू हा श्वसन प्रक्रियेवर अटॅक करणारा असल्याने अंगावर दुखणे काढल्यास जिवावर बेतण्याचाच प्रकार ठरतो. किंबहुना सुरुवातीला झालेल्या आठ ते दहा ‘होमडेथ’ याच प्रकारातील रुग्ण होते, असे आरोग्य विभागाचे निरीक्षण आहे. त्यामुळे शासनाने सांगितलेल्या त्रिसूत्रीचा वापर करणे व याच माध्यमातून स्वत:सह स्वत:च्या परिवाराची सुरक्षा जपणे हे कोरोना संसर्गाच्या काळात महत्त्वाचे ठरत आहे.
या १० महिन्यांच्या काळात कोरोनाग्रस्तांची संख्यादेखील सातत्याने वाढत आहे. सद्यस्थितीत १९ हजार ९०१ कोरोनाग्रस्तांची नोंद जिल्ह्यात झालेली आहे. म्हणजेच रोज सरासरी ६५ रुग्ण या काळात निष्पन्न झाल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालावरून स्पष्ट होते.
बॉक्स
चाचण्यांची संख्या १.५५ लाख क्राॅस
या १० महिन्यांच्या कालावधीत कोरोना चाचण्यांची संख्या १,५५,३६ वर पोहोचली आहे. यात आरटी-पीसीआर चाचण्या ८१,९२० आहे व यातही विद्यापीठाचे लॅबद्वारा ७२,१६३ नमुन्यांची तपासणी केलेली आहे. रॅपिड अँन्टीजेनमध्ये ७१,९१५ चाचण्या शनिवारपर्यंत करण्यात आल्या आहेत. यात शहरी भागात ४०,०८३, तर ग्रामीणमध्ये ३१,८७२ चाचण्या करण्यात आल्या. या सर्व प्रकारात १,३४,५४१ नमुने निगेटिव्ह आलेले आहेत.
बॉक्स
५० रुग्ण गंभीर स्थितीत
आरोग्य विभागाच्या अहवालानूसार शनिवारपर्यंत ३४१ कोरोनाग्रस्तांना आयसोलेशनमध्ये ठेवलेले आहे. २९१ रुग्ण साधारण परिस्थितीत, तर ५० रुग्ण गंभीर स्थितीत आहेत. शनिवारी जिल्ह्यात १५६३ नमुन्यांची तपासणी करण्यात आलेली आहे. उपचारानंतर बरे वाटल्याने आतापर्यंत १९,१०० रुग्णांना कोरोनामुक्त करण्यात आलेले आहे. या आठवड्याात ग्रामपंचायत निवडणुकांमुळे चाचण्यांची संख्यावाढ झालेली आहे.