कोरोना विषाणू भेदभाव करीत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:13 AM2021-03-14T04:13:07+5:302021-03-14T04:13:07+5:30
अमरावती : कोरोनाचा विषाणू भेदभाव करीत नाही. त्यामुळे समाजात सामूहिक प्रतिकारशक्ती विकसित होण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सहाय्यभूत ठरणार ...
अमरावती : कोरोनाचा विषाणू भेदभाव करीत नाही. त्यामुळे समाजात सामूहिक प्रतिकारशक्ती विकसित होण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सहाय्यभूत ठरणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी शनिवारी दिली.
एका वर्षांपासून कोरोना संसर्गाशी संघर्ष सुरू आहे. पूर्वी वैद्यकशास्त्र प्रगत नव्हते. त्यामुळे विषाणूचा नैसर्गिक ऱ्हास व सुरक्षित अंतर याच दोन गोष्टी साथ आटोक्यात आणण्यासाठी उपलब्ध होत्या. आता मात्र वैद्यकशास्त्राच्या प्रगतीमुळे या विषाणूबाबत जाणून घेता येते. त्याचाच फायदा आपल्याला ही साथ आटोक्यात आणण्यासाठी होणार असल्याचे डॉ. निकम म्हणाले.
एकूण समाजात निर्माण झालेली प्रतिकारशक्ती ही कोणतीही साथ आटोक्यात आणण्यासाठी महत्त्वाची असते. जेव्हा माणसाच्या शरीरात आजाराचा जिवाणू किंवा विषाणू प्रवेश करतो, त्यावेळी शरीर त्याला शत्रू समजून त्याच्याविरुद्ध लढण्यासाठी शक्ती तयार करतो, ती प्रतिकारशक्ती आहे. नैसर्गिकरीत्याही शक्ती विषाणूचा प्रवेश झाल्यानंतरच विकसित होते. शास्त्रीय मीमांसेनुसार साथ आटोक्यात येण्यासाठी कमीतकमी सत्तर टक्के लोकसंख्येमध्ये सामाजिक प्रतिकारशक्ती निर्माण झाली पाहिजे. तसे झाले तर कोरोनाचा असर संपेल व मानव सुरक्षित होईल, असे सीएस म्हणाले.
बॉक्स
दोन प्रकारे प्रतिकारशक्ती विकसित
* आजाराचा संसर्ग झाल्याने आणि दुसरे त्या आजाराचे लसीकरण केल्याने प्रतिकारशक्ती निर्माण होते. आजार होऊ नये म्हणून जी लस दिली जाते, ती खरेतर ज्या विषाणूने आजार होतो, त्याचाच घटक किंवा मृत विषाणू किंवा निष्क्रिय विषाणू मनुष्याच्या शरीरात टाकला जातो. शरीर त्याला शत्रू मानून त्याच्याविरुद्ध प्रतिकारशक्ती तयार करते.
बॉक्स
कृत्रिम प्रतिकारशक्तीद्वारे विषाणूशी लढा
या आजाराचा संसर्ग होऊन बरे झालेल्यांमध्ये प्रतिकारशक्ती तयार झाली. मात्र, ज्यांना अजूनपर्यंत संसर्ग झालेला नाही, त्यांच्या शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण झालेली नाही. त्याचप्रमाणे, ज्यांच्या शरीरात संसर्गाने नैसर्गिक प्रतिकारशक्ती निर्माण झाली, ती किती दिवस टिकेल, याची निश्चित माहिती नाही. त्यामुळे लसीकरणामुळे कृत्रिम प्रतिकारशक्ती निर्माण करू शकतो, तज्ज्ञांचे मत आहे.