कोरोनाचे मृत्यू वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 05:00 AM2021-03-24T05:00:00+5:302021-03-24T05:00:53+5:30
जिल्ह्यात पहिल्या कोरोना संक्रमिताचा मृत्यू ४ एप्रिल रोजी झाला. १ जानेवारीपर्यंत ४०७, १ फेब्रुवारीला ४१७ व आता २२ मार्चला संक्रमितांच्या मृत्यूची संख्या ही ६३५ झाली. दररोज सरासरी चार ते पाच रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू होत आहे. कोरोनाला क्षुल्लक समजणे महागात पडत आहे. अंगावर दुखणे काढणे, कोरोना चाचाणी उशिराने करणे जिवावर बेतणारे ठरत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोना संसर्गाचा आलेख अलीकडे माघारला असताना रुग्णांच्या मृत्युसंख्येत झालेली वाढ धक्कादायक आहे. १ फेब्रुवारी ते २२ मार्च या ५० दिवसांत तब्बल २१८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात पहिल्या कोरोना संक्रमिताचा मृत्यू ४ एप्रिल रोजी झाला. १ जानेवारीपर्यंत ४०७, १ फेब्रुवारीला ४१७ व आता २२ मार्चला संक्रमितांच्या मृत्यूची संख्या ही ६३५ झाली. दररोज सरासरी चार ते पाच रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू होत आहे. कोरोनाला क्षुल्लक समजणे महागात पडत आहे. अंगावर दुखणे काढणे, कोरोना चाचाणी उशिराने करणे जिवावर बेतणारे ठरत आहे.जिल्ह्यात १ जानेवारीनंतरच्या कोरोना विस्फोटात तब्बल २६,०९२ कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे.
रुग्णसंख्येत वाढ झाल्यानंतर दोन टक्क्यांवर आलेला मृत्यूचा दर हा १.३२ टक्क्यांपर्यंत माघारला आहे. मात्र, आता रुग्णसंख्या घटत असताना या दराने उचल खाल्ली आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, अनेकदा रुग्ण कोरोनाऐवजी अनावश्यक चाचण्या करतात. त्याला ‘एचआरसीटी’सारखी महागडी तपासणी करण्यास सांगितले जाते. कोरोना चाचणी उशिरा केल्यानेही धोका वाढत असल्याचे सांगण्यात आले. संक्रमित मृतांमध्ये ६० ते ७० वर्षे वयोगटातील ज्येष्ठांचा समावेश अधिक आहे.
त्रिसूत्रीऐवजी आता पंचसूत्री
कोरोना नियंत्रणासाठी आतापर्यंत चेहऱ्याला मास्क, वारंवार हात धुणे व सॅनिटायझरचा वापर या त्रिसूत्रीचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाद्वारे करण्यात येत होते. आता त्यामध्ये कोरोना चाचणी व लसीकरण यांचा समावेश करून पंचसूत्रीचा अवलंब करण्याचे आवाहन आरोग्य विभागाद्वारे करण्यात आले आहे.
लसीकरणाचा वेग वाढणार केव्हा?
६० वर्षावरील ज्येष्ठ व ४५ वर्षांवरील कॉमार्बिड आजाराच्या नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यत दगावलेल्या संक्रमितांमध्ये ८० टक्क्यांवर प्रमाण याच वयोगटातील आहे. जिल्ह्यात ४५ वर्षावरील ८,०४६ व ६० वर्षावरील ५०,५१७ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. एकूण उद्दिष्टाच्या तुलनेत हे प्रमाण खूपच कमी आहे. लसीकरणाची गती वाढण्याची गरज आहे.