कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’ने वाढविली चिंता !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:10 AM2021-06-25T04:10:43+5:302021-06-25T04:10:43+5:30
अमरावती : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट कमी होत नाही तोच, याच विषाणूचा नवा व्हेरिएंट असलेल्या ‘डेल्टा प्लस’ या विषाणूचे ...
अमरावती : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट कमी होत नाही तोच, याच विषाणूचा नवा व्हेरिएंट असलेल्या ‘डेल्टा प्लस’ या विषाणूचे संकट राज्यात घोंघावत आहे. राज्यात या आजाराच्या २१ रुग्णांची नोंद झाल्याने प्रशासनाद्वारे गंभीरतेने घेतले जात आहे. जिल्ह्यात या विषाणूच्या एकाही रुग्णाची नोंद नसली तरी सावधगिरीच्या उपाययोजना जिल्हाधिकाऱ्यांनी सुरू केल्या आहेत.
राज्यात सध्या रत्नागिरी येथे नऊ रुग्ण, जळगावात सात, मुंबईत दोन, पालघर, सिंधुदुर्ग व ठाणे येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झालेली आहे. राज्यात पहिल्यांदा आढललेल्या बी.१७१७.२ या विषाणूचे म्युटेशन होऊन व आणखी उत्परिवर्तन होऊन ‘डेल्ट प्लस’ हा नवा व्हेरिएंट तयार झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. कोरोना विषाणू वारंवार आपले रूप बदलत आहे. आफ्रिका, इंग्लडनंतर आता भारतातही नवे स्ट्रेन आढळून आले आहेत. या नव्या स्ट्रेनला डेल्टा व काप्पा अशी नावे देण्यात आलेली आहेत. यामधील ‘डेल्ट प्लस’ हा व्हेरिएंट अधिक घातक व याचा संक्रमण दर जास्त असल्याचे सांगण्यात आले आहे.
जिल्ह्यात जरी या विषाणूच्या संक्रमित रुग्णाची नोंद झालेली नसली तरी खबरदारीचा उपाय म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. आता शहरासोबत ग्रामीण भागातही आदेश जारी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
बॉक्स
जिल्ह्यात ही खबरदारी
* जिल्ह्यात डेल्टा विषाणूचा शिरकाव होऊ नये यासाठी शहरासोबतच ग्रामीण भागात मास्क नसल्यास ७५० रुपये व फिजिकल डिस्टन्स नसल्यास ३५ हजारांच्या दंडाची आकारणी करण्यात येणार आहे.
* याशिवाय चार उपजिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात पुन्हा विविध विभागाच्या २० अधिकारी व प्रत्येक पथकात पोलीस कर्मचारी असलेली विशेष मोहीम पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.
शहरातील चौकाचौकात या पथकांद्वारा दंडनीय कारवाई केल्या जाणार आहे. पहिल्यांदा आढळल्यास दंड व दुसऱ्यांदा आढळल्यास फौजदारी कारवाई सोमवारपासून सुरू होण्याची शक्यता आहे.
बॉक्स
जिल्ह्यात रोज चार हजारांवर चाचण्या
* कोरोनाची साखळी खंडित व्हावी, याकरिता चाचण्या वाढविण्यावर भर देण्यात आला असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
* सध्या रोज चार हजारांवर चाचण्या जिल्ह्यात होत आहेत. यामध्ये दोन हजार आरटीपीसीआर व दोन हजारांवर रॅपिड टेस्ट होत आहेत.
* अनलॉकमध्येही कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन व्हावे, याकरिता शहरासह ग्रामीण भागात कारवाईसाठी पथकांची स्थापना करण्यात येत आहे.
पाॅइंटर
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आढावा
कोरोनाचे एकूण रुग्ण : ९५,७२६
बरे झालेले रुग्ण : ९३,५३७
उपचार घेत असलेले : ९४३
बळी : १,५४६
गृहविलगीकरण : ६४६