मेळघाटात कोरोनाची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:13 AM2021-04-20T04:13:12+5:302021-04-20T04:13:12+5:30
अनिल कडू परतवाडा : मेळघाटात कोरोनाची दहशत बघायला मिळत असून, तो दऱ्याखोऱ्यांमध्ये पसरला आहे. यात कोरोनाचे शेकडो रुग्ण नोंदले ...
अनिल कडू
परतवाडा : मेळघाटात कोरोनाची दहशत बघायला मिळत असून, तो दऱ्याखोऱ्यांमध्ये पसरला आहे. यात कोरोनाचे शेकडो रुग्ण नोंदले गेले आहेत. मृतकांची संख्या ही वाढत आहे. मृत्यूने दोन अंकी आकडा ओलांडला आहे.
दरम्यान, मेळघाटातील प्रशासनही कोरोनाग्रस्त आहे. महसूल विभागातील तहसीलदारांपासून तलाठ्यांपर्यंत, वन व वन्यजीव विभागातील उपवनसंरक्षकासह सहायक वनसंरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी व वनकर्मचारी तसेच मेळघाटातील प्रशासकीय यंत्रणेतील अन्य अधिकारी व कर्मचारी कोरोना संक्रमित झाले आहेत. यातील काही दुरुस्त झाले, तर काही आजही कोरोनाग्रस्त आहेत. कधी नव्हे एवढे रुग्ण मेळघाटातील धारणी व चिखलदरा तालुक्यात नोंदविले जात आहेत. यात तेथील रहिवासी व प्रशासन भयभीत असून, सर्वत्र कोरोना चर्चेत आला आहे. काही आदिवासी बांधवांसह अन्य रहिवाशांना कोरोनासदृश लक्षणे असली तरी ते औषधोपचारापासून दुर्लक्षित आहेत. संसर्ग कमी करण्यासाठी कोरोनाच्या लसीकरणासह संक्रमितांच्या नातेवाइकांची चाचणी मोहीम राबविण्याची गरज आहे.
बॉक्स
मेळघाटातील प्राथमिक आरोग्य केंद्रे रुग्णांअभावी ओस
प्राथमिक आरोग्य केंद्रात साध्या तापाचे रुग्णही सद्यस्थितीत दाखल नाहीत. मेळघाटात कोरोना संक्रमण वाढत असले तरी लसीकरणाचा वेग मंदावला आहे. कोरोनाच्या अनुषंगाने रॅपिड अँटिजेन व आरटी-पीसीआर चाचणीही मंदावली आहे.
मेळघाटातील दऱ्याखोऱ्यांमध्ये वसलेल्या आदिवसांमध्ये जनजागृतीची आवश्यकता आहे.