अक्षयतृतीया सणावर कोरोनाचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:12 AM2021-05-14T04:12:33+5:302021-05-14T04:12:33+5:30
फोटो पी १३ चांदूरबाजार चांदूर बाजार : अक्षयतृतीयेच्या निमित्ताने दरवर्षी शहरातील गांधी चौक मार्गावर मुख्य बाजारपेठेत मातीचे ...
फोटो पी १३ चांदूरबाजार
चांदूर बाजार : अक्षयतृतीयेच्या निमित्ताने दरवर्षी शहरातील गांधी चौक मार्गावर मुख्य बाजारपेठेत मातीचे लाल रंगाचे मडके मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येतात. परंतु, आता लॉकडाऊन असल्याने ही मडकी खरेदी करण्यास ग्राहकच नसल्याने अक्षयतृतीयेच्या सणावर कोरोनाचे सावट पसरले आहे.
अक्षयतृतीया हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. अक्षयतृतीया सणानिमित्त शेतीच्या कामाच्या अवजारांची पूजा करून शेतीच्या कामाला प्रारंभ केला जातो. शेतकरी वर्ग या दिवसाला विशेष महत्त्व देतात. या दिवशी पूर्वजांचे पूजन करून पाण्याचे दान केले जाते. या सणाला मातीचे माठ दान करण्याची प्रथा सुद्धा आहे.
तसेच पूर्वजांची आठवण म्हणून छत्री व पायात घालायचे जोडे, जलकुंभ दान देण्याची प्रथा आहे. या अक्षयतृतीया सणाचे महत्त्व विष्णू पुराणात सांगितले आहे. अक्षयतृतीयाला केलेले दान वाया जाणार नाही, अशी प्रथा पुराणात आहे. काही ठिकाणी चैत्र शुद्ध तृतीयाला बसलेल्या गौरीचे विसर्जनसुद्धा या दिवशी केले जाते. प्रत्येक सणाचे वेगवेगळे महत्त्व असले तरी दानाचे महत्त्व अक्षयतृतीयाला महत्त्वाचे मानले गेले आहे. त्यामुळे आता कोरोनाच्या संक्रमणात सर्वसामान्य परिवारांना साहित्य दान देऊन एकमेका सहाय्य करू, हा निर्धार करूनच संकटात साथ देण्याची गरज आहे.
यावर्षी अक्षयतृतीया सणावर कोरोनाचे सावट असल्याने कुंभार समाजाने बनविलेले खास मडके विकणे कठीण झाले आहे. यामुळे शिरजगाव बंड येथील राम रोतळे या कुंभाराने एका हातगाडीत मडके भरून घरोघरी विक्री करीत आहे. गत वर्षी २५ रुपयांना मिळणारे पूजेचे मडके हे आता ५० ते ६० रुपयांना विक्री होत आहे. व्यवसाय बंद असला तरी सण उत्सव साजरे करणे आपली प्रथा आहे.