रामनवमी, हनुमान जयंती उत्सवावरही कोरोनाचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:12 AM2021-04-14T04:12:48+5:302021-04-14T04:12:48+5:30
अमरावती : सलग दुसऱ्या वर्षी कोरोना संकटामुळे गुढी पाडव्यापाठोपाठ विविध उत्सव साजरे करताना कोरोनाचे नियम पाळावे लागणार आहे. मंगळवार, ...
अमरावती : सलग दुसऱ्या वर्षी कोरोना संकटामुळे गुढी पाडव्यापाठोपाठ विविध उत्सव साजरे करताना कोरोनाचे नियम पाळावे लागणार आहे. मंगळवार, १३ एप्रिल रोजी गुढीपाडवा सण पार पडला. १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव, पवित्र रमजान महिना आहे. २१ एप्रिलला रामनवमी, तर २७ एप्रिल हनुमान जयंती आहे. गुढीपाडवा हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्त्वाचा सण म्हणून साजरा केला जातो.
साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला हा दिवस सर्व प्रकारचे वैभव घेऊन आलेला आहे. हिंदू धर्म पंचांगाप्रमाणे आज नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर वसंत ऋतुची सुरुवात या दिवशी होत असते. इंग्रजी महिन्याप्रमाणे जसे १ जानेवारीला कॅलेंडर बदलतात तसेच गुढीपाडव्याच्या दिवशी हिंदू धर्मातील नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी व्यवसाय प्रारंभ, नवा उपक्रमाचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. मात्र, यावर्षी कोरोनाच्या धास्तीमुळे ३० एप्रिलपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचे आदेश धडकल्यामुळे खरेदीवर कोरोनाचे सावट आहे. यावर्षी नवीन वर्षाच्या सुरुवातीला कोरोनाची दुसरी लाट अतिवेगवान झाल्यामुळे कोरोनाची भीती घराघरांत निर्माण झाली आहे. त्यामुळे गुढीपाडवा व त्यापाठोपाठ रामनवमी, हनुमान जयंती या सणावर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे सावट निर्माण झाले आहे .
बॉक्स
साध्या पद्धतीने उत्सव
मराठी नवीन वर्षाची सुरुवात कोरोनाच्या सावटाखाली झाली. यानंतर रामनवमी, हनुमान जयंतीचा उत्सवही कोरोनाचे नियम पाळूनच साध्या पद्धतीने साजरा करावा लागणार आहे. आगामी सण, उत्सव साजरे करताना कोराेनाला हद्दपार करण्याचा निश्चय होणे गरजेचे आहे.