Coronavirus : अमरावती-मुंबई एक्स्प्रेस प्रवाशांची रिफंडसाठी गर्दी, दरदिवशी १२५ ते १५० तिकीट रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 07:39 PM2021-05-03T19:39:38+5:302021-05-03T19:39:44+5:30
Coronavirus in Maharashtra :अमरावती-मुंबई एक्सप्रेस २७ एप्रिल ते १० मे दरम्यान १४ दिवसांसाठी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांनी या कालावधीत आरक्षित केलेली तिकीट रद्द करून रिफंडचा सपाटा चालवला आहे.
अमरावती : कोरोना संसर्गाचा परिणाम आणि कडक लॉकडाऊनमुळे अमरावती-मुंबई एक्स्प्रेस १० मेपर्यंत रद्द करण्यात आली आहे. २७ एप्रिलपासून दरदिवशी १२५ ते १५० आरक्षण तिकीट रद्द होत असून, अंदाजे पावणेदोन लाख रुपये प्रवाशांना परत करावे लागत आहेत. ज्या प्रवाशांनी ई-तिकीट बूक केले, त्यांना रेल्वे खिडक्यांवरून रक्कम परत दिली जात नाही, अशी माहिती आहे.
अमरावती-मुंबई एक्सप्रेस २७ एप्रिल ते १० मे दरम्यान १४ दिवसांसाठी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांनी या कालावधीत आरक्षित केलेली तिकीट रद्द करून रिफंडचा सपाटा चालवला आहे. लॉकडाऊनमुळे बूकिंग कमी झाल्यामुळे मुंबई एक्स्प्रेस बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. पश्चिम विदर्भातील प्रवाशांच्या पसंतीला खरी उतरलेली ही रेल्वे गाडी काही दिवसांपासून निम्मे बर्थ रिकामे घेऊन धावत होती. २७ एप्रिलपासून अमरावती येथील मॉडेल रेल्वे स्थानकावरील आरक्षण खिडक्यांवर रिफंड मिळण्यासाठी प्रवाशांची रांग दिसत आहे. दरदिवशी तिकीट रद्द करण्यापोटी प्रवाशांना सव्वा ते दीड लाख रुपये परत करावे लागत आहेत.
सात दिवसांत अशी परत केली रक्कम (रिफंड)
२७ एप्रिल : १ लाख ३४ हजार
२८ एप्रिल : १ लाख २८ हजार
२९ एप्रिल : १ लाख ४७ हजार
३० एप्रिल : १ लाख २९ हजार
१ मे : १ लाख ४६ हजार
२ मे : १ लाख २५ हजार
३ मे : १ लाख ५० हजार