Coronavirus in Amravati; अमरावतीत कॉन्टॅक्ट ट्रेसिंग नावालाच, व्यक्तींचा मुक्त वावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 08:51 AM2021-05-11T08:51:42+5:302021-05-11T08:52:52+5:30
Amravati news कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी संक्रमितांच्या संपर्कातील अधिकाधिक व्यक्तींच्या चाचण्या होणे महत्त्वाचे आहे. जिल्ह्यात अलीकडे हा प्रकार नावालाच उरला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी संक्रमितांच्या संपर्कातील अधिकाधिक व्यक्तींच्या चाचण्या होणे महत्त्वाचे आहे. जिल्ह्यात अलीकडे हा प्रकार नावालाच उरला आहे. फक्त लिखापोती सुरू असताना प्रशासनाच्या लेखी एका रुग्णामागे ८ ते १० जणांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होत आहे. त्यामुळेच कोरोनाचा संसर्ग वाढला आहे.
प्रत्येक रुग्णामागे किमान २० जणांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्याचे निर्देश असताना जिल्ह्यात हा प्रकार जवळजवळ बंदच झालेला आहे. संसर्गाचे भीतीपोटी नागरिकच स्वत:हून कोरोनाच्या चाचण्या करीत आहेत. मात्र, चाचण्या टाळण्याचा प्रकार जेथे घडला त्या ठिकाणी कुटुंबचे कुटुंब पॉझिटिव्ह आल्याची कित्येक उदाहरणे आहेत. रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींनी कोरोना चाचण्या केल्यास अटकाव करता येतो. चाचण्या न करता लक्षणे अंगावर काढल्याचा प्रकार अंगलटदेखील आला आहे. उपचारादरम्यान रुग्ण दगावण्याच्या अनेक घटनांमध्ये अन्य कारणांसोबत अंगावर दुखणे काढणे हे एक प्रमुख कारण आहे.
संक्रमितांच्या १५ फुटांच्या आत वावरणाऱ्या व्यक्तीने जर मास्क, सॅनिटायझरचा वापर केला नसेल, तर अशा व्यक्ती जोखीम या गटात मोडतात. या सर्व व्यक्तींनी संपर्कात आल्याच्या दोन-तीन दिवसांत कोरोना चाचणी करणे महत्त्वाचे आहे. यापूर्वी रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना संपर्काविषयी विचारणा व्हायची, ही व्यक्ती कुठे-कुठे गेली, याविषयीची चौकशी होऊन आरोग्य विभागाचे पथक त्या घरी पोहोचून आरोग्यविषयक माहिती घ्यायचे व त्या परिवारातील सदस्यांना चाचण्या करण्याची सूचना दिली जात होती. आशा व एएनएम पथकाद्वारे ही प्रक्रिया पार पाडली जात होती. आता मात्र हा प्रकार नावालाच आहे. शहर असो की ग्रामीण कुठेही कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना चाचण्या वाढण्याचे हे देखील एक प्रमुख कारण ठरले आहे.
‘ब्रेक द चेन’साठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग महत्त्वाचे
घरातील एक व्यक्ती संक्रमित झाल्यास त्या घरातील सर्वांची आरटीपीसीआर चाचणी करणे महत्त्वाचे आहे. याचे गांभीर्य लक्षात आल्याने शहरात आता संक्रमितांच्या कुटुंबातील व्यक्ती चाचण्या करीत असल्याचे दिसून येते. ग्रामीण भागात अद्यापही कॉन्टॅक्ट ट्रेसिंग हा प्रकार होत नाही किंबहुना आरोग्य यंत्रणेचे याकडे दुर्लक्षच आहे. त्यामुळे कोरोनाची ‘ब्रेक द चेन’ कशी होणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ४,५७.४९८ चाचण्या
जिल्ह्यात आरटीपीसीआर व रॅपिड अँटिजनच्या आतापर्यंत ४,५७,४९८ चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये १६.४८ पॉझिटिव्हिटी नोंद करण्यात आली आहे. मार्च व एप्रिलमध्ये रोज उच्चांकी आठ हजारांपर्यंत चाचण्या करण्यात येत होत्या. आता मात्र हे प्रमाण साडेतीन ते चार हजारांपर्यंतच आहे व चाचण्यांमध्ये रुग्ण पॉझिटिव्ह नोंद होण्याचे प्रमाण २३ ते ३० टक्क्यांपर्यंत आहे.
जिल्ह्यात एका रुग्णामागे आठ ते १२ जणांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होत आहे. संक्रमितांच्या परिवारातील व्यक्तींना चाचण्या करण्याविषयीची सूचना केली जाते.
डॉ. दिलीप रणमले
जिल्हा आरोग्य अधिकारी