Coronavirus in Amravati; यावर्षी सालगड्याचा मोबदला लाखाचा उंबरठा पार करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 03:56 PM2021-05-04T15:56:40+5:302021-05-04T15:57:00+5:30
Amravati news Agriculture संपूर्ण शेती घरी करावयाची असल्यास सालगडी ठेवावा लागतो. मात्र, सालगड्याचे भाव वधारले आहेत. यावर्षी सालगड्याचा भाव लाखाचा टप्पा पार करणार असल्याचे बोलले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : दरवर्षी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सालगडी ठेवून शेती काम करण्यास शेतकरी सज्ज होतात. परंतु गेल्या काही वर्षात सततच्या नापिकीने शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे, तर शेती जास्त असलेले शेतकरी काही शेती बटाई पद्धतीने देण्यावर जास्त भर देत आहेत. संपूर्ण शेती घरी करावयाची असल्यास सालगडी ठेवावा लागतो. मात्र, सालगड्याचे भाव वधारले आहेत. यावर्षी सालगड्याचा भाव लाखाचा टप्पा पार करणार असल्याचे बोलले जात आहे.
यावर्षी अतिवृष्टी झाल्याने ओल्या दुष्काळाचे चटके शेतकऱ्यांना सहन करण्याची वेळ येत आहे. चारा टंचाई व पाणीटंचाईमुळे नागरिक हैराण होत आहेत. अनेक जंगलव्याप्त भागात पाण्याची टंचाई उद्भवत असल्याने पशुपालक व शेतकऱ्यांना कमालीचा त्रास होत आहे. शिवाय पशुखाद्य महाग झाल्यामुळे चाऱ्याच्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे. यंत्रयुगात शेती महागडी झाली आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती करणे अवघड झाले असल्याने बटाईने शेती घेण्याससुद्धा कोणी तयार होत नाही.
कसे बसे शक्य झाले तर नापिकी व शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शेती करण्यासाठी सालगडी ठेवणेही कठीण झाले आहे. पूर्वी मोठ्या शेतकऱ्यांकडे तीन ते चार सालगडी असायचे. परंतु आता सालगड्याचे भाव वधारल्याने पगार देण्यासाठी नगदी रक्कम आणायची कुठून, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहे. गुढी पाडव्याच्या दिवशी ग्रामीण भागात वर्षभरासाठी सालगडी ठेवला जातो. परंतु तालुक्याच्या ठिकाणी ग्रामीण भागात मोजण्याइतके शेतकरी सोडले तर कोणी शेतकरी सालगडी ठेवण्यास धजावत नाहीत.
गतवर्षी सालगड्याचा दर ७० ते ८० हजार रुपये प्रतिवर्ष होते. यंदा यात मोठी वाढ झाली असल्याचे बोलले जात असून, ८० ते ९० हजार रुपये वर्ष याप्रमाणे पैसे द्यावे लागत आहेत. सततच्या दुष्काळाने सालगडी ठेवणे शक्य नाही. त्यामुळे शेतकरी आता आपली शेती बटाईने देण्याचा विचार करत असल्याचे दिसून येत आहे. सालगड्याला पगार देण्यापेक्षा शेतात जाऊन काम केलेले पुरेल. एकंदरीत शेताची अवस्था दयनीय झाली असून, शेतकऱ्यांमध्येसुद्धा उत्साह दिसत नाही.
शेतकरी निरूत्साही
शेतकऱ्यांसाठी गुढीपाडवा हा महत्त्वाचा सण आहे. हे नवे शेतीचे वर्ष म्हणून शेतकरी नव्या वर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून करतात. नवीन शेतात नवीन रोप बनवणे, रोपांची लागवड करणे, आदी काम गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर केली जातात. मात्र, यावर्षी शेतकरी सालगडी शोधण्याच्या प्रयत्नात दिसत नाहीत. गेल्या चार वर्षांपासूनच्या सततच्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे अर्थचक्र कोलमडले आहे. लावलेला खर्चही शेतातून निघालेला नाही. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झालेले आहेत. त्यामुळे शेतकरी सालगडीसुद्धा ठेवण्याच्या मनस्थितीत नाही.