coronavirus : विद्यापीठांच्या परीक्षांबाबत यूजीसी’च्या शिफारशीनंतरच निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 07:52 PM2020-04-19T19:52:49+5:302020-04-19T19:57:24+5:30
परीक्षा आणि शैक्षणिक कॅलेंडरबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने नेमलेल्या समितीचा अहवाल आल्यानंतर राज्यस्तरीय समितीच्या शिफारशींच्या आधारे परीक्षांचा निर्णय घेण्यात येईल
अमरावती - कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विद्यापीठे आणि त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयांच्या उन्हाळी परीक्षा लांबणीवर पडणार आहेत. परीक्षा आणि शैक्षणिक कॅलेंडरबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने नेमलेल्या समितीचा अहवाल आल्यानंतर राज्यस्तरीय समितीच्या शिफारशींच्या आधारे परीक्षांचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. यामुळे विद्यापीठाच्या परीक्षा लांबणीवर पडण्याची दाट शक्यता आहे.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने १५ एप्रिलपासून प्रारंभ होणाºया परीक्षा पुढील शासनादेशापर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान राज्य शासनाने परीक्षा संदर्भात नेमलेल्या समितीची बैठक १४ एप्रिल रोजी पार पडली. मात्र, यूजीसीने देशभरात परीक्षाविषयी नेमलेल्या समितीच्या शिफारशीनंतरच विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षांचा निर्णय होईल, हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मे महिन्याच्या अखेर परीक्षा घेण्याचे नियोजन तूर्तास लांबणीवर पडल्याचे वास्तव आहे. परीक्षा आणि पुढील शैक्षणिक वर्षाचे नियोजन या दोन्ही बाबी विचारात घेऊन विद्यापीठाच्या परीक्षा घेण्यात येतील, अशी माहिती आहे.
यूजीसीने देशपातळीवर समिती नेमलेली आहे. त्यामुळे राज्यातील विद्यापीठे, महाविद्यालयांच्या परीक्षांचे नियोजन करण्यापूर्वी यूजीसी समितीच्या शिफारशी महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे राज्य शासन परीक्षासंदर्भात कोणता निर्णय घेते, यावर बरेच काही अवलंबून आहे.
- केशव तुपे, सहसंचालक, उच्च व शिक्षण अमरावती