CoronaVirus News In Amravati : पीपीई किट घालून पालकमंत्री पोहोचल्या थेट रुग्णालयात; रुग्णांना दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2020 03:21 PM2020-05-31T15:21:13+5:302020-05-31T15:22:16+5:30
CoronaVirus News In Amravati : रुग्णांना पालकमंत्र्यांनी थेट प्रश्न विचारले. जेवण, उपचार आणि इतर सुविधांबाबत पालकमंत्र्यांनी माहिती जाणून घेतल्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला.
अमरावती : कोविड रुग्णांना नीट उपचार मिळतात का?, त्यांची व्यवस्थित काळजी घेतली जाते की नाही, हे तपासण्यासाठी अमरावतीच्या पालकमंत्री आणि राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी शनिवारी रात्री अचानक कोविड रुग्णालयाला भेट दिली.
पीपीई किट घालून त्यांच्या अशा अचानक कोविड वॉर्डात शिरण्याने डॉक्टरांसह अवघे इर्विन रुग्णालय अचंबित झाले. रुग्णांना पालकमंत्र्यांनी थेट प्रश्न विचारले. जेवण, उपचार आणि इतर सुविधांबाबत पालकमंत्र्यांनी माहिती जाणून घेतल्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला.
गत काही आठवड्यांपासून जिल्हा कोविड रुग्णालयाबाबत तक्रारी प्राप्त होत होत्या. त्यानुसार प्रत्यक्ष जाऊन तेथील परिस्थिती पाहण्याचा व रुग्णांशी थेट भेटण्याचा निर्णय पालकमंत्री ठाकूर यांनी घेतला. तत्काळ तो अंमलातही आणला. दरम्यान त्यांनी जिल्हा कोविड रुग्णालयातील ओपीडी कक्षासह आयसीयू कक्षाचीही पाहणी केली. कोविड वॉर्डात उपचार घेतलेल्या पॉझिटिव्ह रूग्णांशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला.
जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम, डॉ. रवि भूषण यांची टीम अहोरात्र जोखमीच्या क्षेत्रात जीवाची पर्वा न करता काम करीत आहे. पीपीई कीट घालून ही मंडळी दिवसभर रुग्णसेवा देत आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत पीपीई किट घालून दिवसभर काम करणे किती कष्टप्रद राहते, याचा पालकमंत्र्यांनी शनिवारी पीपीई कीट घालून अनुभव घेतला. सगळे डॉक्टर, पारिचारिका, सफाई कर्मचारी अखंडपणे सेवारत आहेत, असे यावेळी पालकमंत्री म्हणाल्या.
कोविड रुग्णालयात दाखल रुग्णांशी मी संवाद साधला. त्यांना पुरविण्यात येणारे जेवण, औषधे, डॉक्टर व इतर कर्मचा-यांची सेवा व वागणूक याबाबत प्रत्येकाची मी स्वत: विचारपूस केली. त्यावेळी सर्व दाखल रूग्णांनी आपणास समाधानकारक सेवा मिळत असल्याचे सांगितले. डॉक्टर रवी भूषण यांच्यासह सर्व डॉक्टर कर्मचारी चांगले काम करीत असल्याची माहिती सर्व रुग्णांनी दिली.
अजूनही आपली लढाई संपलेली नाही. त्यामुळे प्रशासनाचे, आरोग्य यंत्रणेचे मनोबल खच्ची करण्याचा प्रकार कुणीही करता कामा नये. आपल्या सगळ्यांनी मिळून एकजुटीने जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. जिल्ह्यात अद्याप २१८ रुग्ण आढळून आले आहेत. त्यातले १२० रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आढळलेल्या रुग्णांपैकी ५० टक्क्यांहून अधिक रूग्णांवर याच रुग्णालयातून उपचाराने बरे होऊन ते घरी परतले आहेत. उर्वरित रुग्णांवर उपचार होत आहे. डॉक्टर व त्यांची टीम अहोरात्र परिश्रम करीत आहे.
कोविड रुग्णालयातील प्रत्येक रुग्णाला भेटून त्यांची विचारपूस पालकमंत्र्यांनी केली. प्रत्येक वॉर्डाला भेट दिली आहे. या काळात सर्वांनी डॉक्टर व आरोग्य यंत्रणेतील प्रत्येकाचे मनोबल टिकवून ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे व एकजुटीने कोरोनाचा मुकाबला करून त्यावर मात करूया, असे आवाहनही पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी यावेळी केले.