CoronaVirus News : कोरोना उपचारासाठी घेतली मांत्रिकाकडे धाव; महिलेचा मृत्यू, मेळघाटात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 01:48 AM2021-04-17T01:48:39+5:302021-04-17T06:44:59+5:30
CoronaVirus News : मेळघाटातील आदिवासी सर्दी, खोकला, ताप ते प्रत्येक आजार आणि शुभकार्यासाठी मांत्रिकाकडे (भूमका) उपचारासाठी जातात.
- नरेंद्र जावरे
चिखलदरा (अमरावती) : कोरोना तपासणीत पॉझिटिव्ह निघालेली ४५ वर्षीय महिला दवाखान्यातील औषधे सोडून उपचारासाठी नजीकच्या गावातील मांत्रिकाकडे गेली; मात्र गुरुवारी सायंकाळी प्रकृती खालावल्याने तिचा मृत्यू झाला. पॉझिटिव्ह असल्याने प्रशासनाने रात्री अंत्यसंस्कार करण्यासाठी प्रयत्न केले; मात्र नातेवाइकांनी त्यास नकार दिला. अखेर शुक्रवारी २० तासांनंतर नातेवाइकांनी महिलेवर अंत्यसंस्कार केले. या घटनेने मेळघाटात खळबळ उडाली आहे.
मेळघाटातील आदिवासी सर्दी, खोकला, ताप ते प्रत्येक आजार आणि शुभकार्यासाठी मांत्रिकाकडे (भूमका) उपचारासाठी जातात. यात लहान मुलांच्या अंगावर डम्मा (गरम विळ्याचे चटके) देण्यासह विविध अघोरी पद्धत अवलंबविली जात असल्याचे ‘लोकमत’ने अनेकदा प्रकाशित केले आहे.
सूत्रांनुसार, सेमाडोह येथील ४५ वर्षीय विधवा महिलेची तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रॅपिड अँटिजन चाचणी करण्यात आली होती. ती पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल १२ एप्रिल रोजी १०.५० वाजता डॉक्टरांनी दिला. त्यानुसार सदर महिलेला होमक्वारंटाईन करण्यात आले. तपासणी अहवाल पॉझिटिव्ह असला तरी आपणास काहीच झालेले नाही, असे प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना सुनावून तिने उपचारासाठी सेमाडोहपासून दहा किमी अंतरावरील भवई गाव गाठले. तेथे नातेवाइकांच्या मदतीने कोरोनावर मांत्रिकाकडे उपचार सुरू केला; मात्र या दरम्यान आजार बळावल्याने गुरुवारी तिचा मृत्यू झाला.
रात्रभर मृतदेह पडून
- महिलेचा मृतदेह गुरुवारी रात्री ८ वाजता सेमाडोह येथील घरी आणण्यात आला. गावकऱ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे डॉ. महेश कूर्तकोटी, जिल्हा परिषद सदस्य सुनंदा काकड, सरपंच अनिता चिमोटे, ग्रामसेवक सुरेंद्र चिकटे यांना पाचारण केले.
- अंत्यसंस्कार करण्यासाठी आरोग्य यंत्रणा पीईपी किट व साहित्य घेऊन तयार होती. सर्वांनी समजाविले तरी नातेवाईक ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. त्यांच्या हट्टामुळे कोरोना पॉझिटिव्ह असलेला मृतदेह रात्रभर घरीच ठेवला. अखेर शुक्रवारी दुपारी २ वाजता अंत्यसंस्कार झाले.
सेमाडोह येथील कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा मृत्यू शुक्रवारी भवई गावात झाला. उपचारासाठी ती मांत्रिकाकडे गेली होती. अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाइकांनी गुरुवारी रात्री विरोध दर्शविला.
- माया माने,
तहसीलदार, चिखलदरा.