Coronavirus Vaccination : तिसऱ्या दिवशी ५७५ जणांचे लसीकरण, तिवसा केंद्रावर एकाला रिअॅक्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2021 08:20 PM2021-01-20T20:20:11+5:302021-01-20T20:22:51+5:30
Coronavirus Vaccination: कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या दिवशी कोविन अॅपमध्ये लाभार्थीची नावे मिसमॅच होत असल्याने मेसेज केल्यामुळे लसीकरणासाठी आलेल्या काही आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणाविना परतावे लागले होते.
अमरावती : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या तिसऱ्या दिवसी पाच केंद्रांवर ५७५ हेल्थ केअर वर्करचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी दिली. यापैकी तिवसा बुथवर एकाला घाबरल्यासारखे वाटल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या दिवशी कोविन अॅपमध्ये लाभार्थीची नावे मिसमॅच होत असल्याने मेसेज केल्यामुळे लसीकरणासाठी आलेल्या काही आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणाविना परतावे लागले होते. त्यामुळे बुधवारी याविषयी खबरदारी घेण्यात आली. त्यामूळे विहीत वेळेत येथील डॉ पंजाबराव देशमुख वौद्यकीय महाविद्यालयात १२०, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे केंद्रात ११२, तिवसा येथील ग्रामीण रुग्णालयात १३७, अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील केंद्रावर १३८ व अंजनगाव बारी येथील प्राथमिक स्वास्थ केंद्रात ६८ आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. शेवटच्या लाभार्थीसाठी असलेल्या व्हायलमधील काही डोज वाया जात असल्याचे त्यांनी सांगितले
बुधवारी ५०० पेक्षा जास्त एसएमएस
मंगळवारी अर्धे लाभार्थी लसीकरणाविना परत गेल्यामुळे बुधवारी ५०० वर लाभार्थींना एसएमएस पाठविण्यात आले व कोविन अॅपवर नावे मिसमॅच व्हायची हा तांत्रिक दोष जागीच निवारण करण्यात आल्यामुळे कुठलाच तांत्रिक दोष बुधवारी आलेला नाही. त्यामुळे उपस्थितापौकी सर्वानाच लसीचे डोज देण्यात आल्याचे डीएचअि रणमले यांनी सांगितले.