बाधिताचा शहरात वावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 05:00 AM2020-04-20T05:00:00+5:302020-04-20T05:00:51+5:30
येथील बाबा चौक, नुराणी चौकालगत वास्तव्यास असलेल्या ५३ वर्षीय ऑटोचालकाचा १२ एप्रिल रोजी हृदयाघाताने घरीच मृत्यू झाला. तत्पूर्वी त्याला खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. १३ एप्रिलला या परिवारातील पाच व्यक्तींचे थ्रोट स्वॅब घेऊन त्यांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले. मात्र, बाधित युवक विलगीकरण काळात बाहेर फिरल्याची माहिती समोर आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : येथील नुराणी चौकालगत राहणारा १६ वर्षीय कोरोनाबााधित युवक १३ एप्रिलपासून होम क्वारंटाइन होता. मात्र, या युवकाचा बाहेर वावर असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी त्याचा सीडीआर तपासला. यात शहरातील इर्विन चौक, नेमानी गोडवून, तारखेडा, सराफा, बडनेरा आदी ठिकाणच्या टॉवरवर लोकेशन आढळल्याची माहिती आहे. शहरात वावरलेल्या या बाधिताच्या संपर्कात किती व्यक्ती आल्यात, याचा शोध घेण्याचे आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर आहे.
येथील बाबा चौक, नुराणी चौकालगत वास्तव्यास असलेल्या ५३ वर्षीय ऑटोचालकाचा १२ एप्रिल रोजी हृदयाघाताने घरीच मृत्यू झाला. तत्पूर्वी त्याला खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. १३ एप्रिलला या परिवारातील पाच व्यक्तींचे थ्रोट स्वॅब घेऊन त्यांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले. मात्र, बाधित युवक विलगीकरण काळात बाहेर फिरल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या परिवारात २३ व्यक्ती असल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले.
पोलीस सूत्रानुसार, हा पॉझिटिव्ह युवक होम क्वारंटाईन काळात बाहेर वावरल्याच्या माहितीवरून त्या युवकाचा सीडीआर तपासला. लोकेशननुसार हा युवक खेळासाठी, फळे विकायला, इलेक्ट्रीशियनच्या कामाकरिता शहरात वावरल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी याविषयी महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेला अवगत केल्याचे सांगितले.
‘ते’ डॉक्टर होम क्वारंटाइन केव्हा?
नुराणी चौकातील ५३ वर्षीय ऑटोचालकाचा घरीच मृत्यू झाला. त्यांचा १६ वर्षीय मुलगा तीन दिवसांत पॉझिटिव्ह आला. त्या मृताचा थ्रोट स्वॅब घेतला गेला नसल्याची बाब उघड झालेली आहे. मृतावर पहिले शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. ‘त्या’ डॉक्टरला होम क्वारंटाईनचा सल्ला देण्यात आल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिली. मात्र संबंधित डॉक्टर अद्याप होम क्वारंटाइन नसल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
हातावर शिक्का कुठे?, शाईविषयी शंका
नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने होम क्वारंटाईनची प्रक्रिया शहरासह जिल्ह्यात सुरू आहे. या व्यक्तींच्या हातावर याविषयीचे शिक्के मारण्यात येतात. मात्र, ही शाई धुतल्यावर निघून जात असल्याने संबंधित व्यक्ती घराबाहेर वावरत असताना होम क्वारंटाईन असल्याचे ओळखल्या जात नाही. किंबहुना यासंबंधात आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या शाईच्या बॉटल ह्या मुदतबाह्य असल्याने एका कर्मचाºयाने याविषयीची सूचना महापालिका प्रशासनाला दिल्याचे सांगण्यात आले.
रविवारी ६३ व्यक्ती क्वारंटाईन
जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या माहितीनुसार, रविवारी ३० नमुने तपासणीला पाठविण्यात आले. अगोदर तपासणीला पाठविलेले ३८ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच दैनिक संशयित १०५ रुग्ण, तपासणी केलेले नागरिक ५१६३, सध्या भरती असलेले संशयित १२, आतापर्यंत एकूण भरती संशयित ३६०, एकूण दाखल पॉझिटिव्ह ५, तपासणीला पाठविलेले नमुने ५५७, आतापर्यंत कोविड-१९ पॉझिटिव्ह नमुने ६ (१ मय्यत), डिस्चार्ज केलेले संशयित ३२२, रविवारी अलगीकरण कक्षात भरती असलेले संशयित ६३, पाठपुरावा सुरू असलेले एकूण संशयित ४७४९ असल्याचे अहवालात नमूद आहे.
कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या १६ वर्षीय युवकाचा कुणाकुणाशी संपर्क आला, यादृष्टीने आरोग्य व पोलीस विभागाद्वारा माहिती घेण्यात येत आहे. त्या सर्वांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे
- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी