मेळघाटात सेमाडोह नजीक महामंडळाची बस दरीत कोसळली, दोन महिलांचा मृत्यू, २५ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 01:47 PM2024-03-24T13:47:48+5:302024-03-24T13:50:06+5:30
अमरावती वरून निघालेली परतवाडा आगाराची एम एच ०७ सी ९४७८ क्रमांकाची बस परतवाडा घटांग सेमाडोह धारणी तूकईथड जात असताना हा अपघात झाला.
नरेंद्र जावरे -
परतवाडा : अमरावती वरून मध्यप्रदेशच्या तुकईथड येथे निघालेली परतवाडा आगाराची बस रविवारी सकाळी ११:३० वाजता जवाहर कुंड येथे घाट वळणावर अचानक अनियंत्रित झाल्याने ३० फूट खोल दरीत कोसळली. त्यात दोन महिला ठार तर २५ पेक्षा अधिक जखमी झाल्याची माहिती असून जखमींना नजीकच्या सेमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
इंदू समाधान गंत्रे (६५) रा साठमोरी ता खकणार मध्यप्रदेश, ललिता चिमोटे (३०) बुरडघाट, अशी मृतांची नावे असून त्यांचे मृतदेह अजूनही एसटीमध्येच आहेत. आरोग्य यंत्रणेच्या वतीने तत्काळ जखमींना रुग्णवाहिकेद्वारे सीमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी सामाजिक कार्यकर्ते तथा उपसरपंच राजेश सेमलकर ओमप्रकाश तिवारी सुनील येवले शिवा काकड प्रदीप सेमलकर, लाला कासदेकर बाबू दहीकर असे सेमाडो येथील अनेक जण मदतीला धावले असून घटनास्थळी चिखलदरा पोलीस पोहोचले आहेत. परिवहन महामंडळाचे अधिकारीसुद्धा निघाल्याची माहिती परतवाडा आगाराची व्यवस्थापक जीवन वानखडे यांनी दिली. अमरावती वरून निघालेली परतवाडा आगाराची एम एच ०७ सी ९४७८ क्रमांकाची बस परतवाडा घटांग सेमाडोह धारणी तूकईथड जात असताना हा अपघात झाला.