‘सहायक आयुक्तां’वरून नगरसेवक-प्रशासन आमने-सामने
By Admin | Published: June 17, 2016 12:19 AM2016-06-17T00:19:42+5:302016-06-17T00:19:42+5:30
भाजीबाजार झोनच्या प्रभारी सहायक आयुक्तपदावरून गुरुवारी काही नगरसेवक व प्रशासन समोरासमोर आले.
आढावा बैठकीत चकमक : विधी अधिकाऱ्यांच्या प्रभारावर आक्षेप
अमरावती : भाजीबाजार झोनच्या प्रभारी सहायक आयुक्तपदावरून गुरुवारी काही नगरसेवक व प्रशासन समोरासमोर आले. झोन क्र. पाचची आढावा बैठक होत असताना हा प्रकार घडला. त्यामुळे या झोनचा प्रभार ‘वाटाणे’ नामक कर्मचाऱ्यांकडे जाण्याचे संकेत आहेत.
महापालिका आयुक्त हेमंत पवार यांनी दोन दिवसांपूर्वीच झोन क्र. ५ चे प्रभारी सहायक आयुक्त प्रवीण इंगोले यांचेकडून पदभार काढला होता व त्यांच्या जागेवर विधी अधिकारी श्रीकांत चव्हाण यांची नियुक्ती केली होती. इंगोले यांच्याकडे झोन पाचच्या प्रभारी सहायक आयुक्तपदाची सूत्रे असताना पावती पुस्तक गहाळ प्रकरण उघड होऊन अडीच लाखांचा अपहार प्रकरणी फौजदारी दाखल झाली होती.
याशिवाय पंकज डोनारकर या वसुली लिपिकाला याचप्रकरणी निलंबित करण्यात आले होते. शिवाय अन्य झोनच्या तुलनेत भाजीबाजार झोनची मालमत्ता कर वसुलीही माघारली होती. या अनुषंगाने इंगोले यांच्याकडून सहायक आयुक्तपदाचा प्रभार काढण्यात आला. तथापी गुरुवारी झालेल्या झोननिहाय बैठकीमध्ये एका ज्येष्ठ नगरसेवकांनी इंगोले यांची रदबदली केली, तर श्रीकांत चव्हाण यांच्याबद्दल नकारात्मक सूर लावला. मात्र इंगोले यांना पुन्हा प्रभार देण्यास आयुक्तांनी नापसंती दर्शविली.
आयुक्त या विषयावर फारसे बोललेच नाही. त्यामुळे काही नगरसेवकांनी इंगोले आणि चव्हाणऐवजी वाटाणे नामक कर्मचाऱ्याकडे सहायक आयुक्तपदाचा पदभार देण्याचे विनंती वजा सूचना केली. यावर आयुक्तांनी कुठलाही निर्णय आढावा बैठकीदरम्यान घेतला नाही. त्यामुळे आयुक्तांच्या निर्णयाकडे नगरसेवकांसह महापालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
पश्चिम झोनची आढावा बैठक
आयुक्त हेमंत पवार यांच्या कक्षात पश्चिम झोन क्र. ५ भाजीबाजार अंतर्गत प्रलंबित कामाचा आढावा घेण्याकरिता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत प्रत्येक प्रभागाच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. प्रत्येक नगरसेवकांनी त्यांना येणाऱ्या अडचणी सांगितल्या. काही काम हे त्वरित सुरू करण्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मनपा आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना काम त्वरित सुरू करण्याचे निर्देश दिले. तसेच ज्या कामाला प्रशासकीय मान्यता पाहिजे अशा कामांना त्वरित सादर करण्याची सूचना यावेळी त्यांनी दिली. नगरसेकांची कामे त्वरित होणे अपेक्षित आहे.
सर्वपक्षीय नगरसेवकांची उपस्थिती
सदर बैठकीत पश्चिम झोन सभापती तमीजाबी अहमदखाँ, माजी स्थायी समिती सभापती विलास इंगोले, विरोधी पक्षनेता प्रवीण हरमकर, नगरसेवक भरत चव्हाण, नुरखाँ मौजदार खाँ, नगरसेविका संगीता वाघ, सुनीता भेले, अर्चना इंगोले, उपआयुक्त विनायक औगड, उपआयुक्त चंदन पाटील, शहर अभियंता जीवन सदार, सहायक आयुक्त श्रीकांत चव्हाण, मुख्यलेखा अधिकारी प्रेमदास राठोड, कार्यकारी अभियंता १ अनंत पोतदार, ससनर सुरेंद्र कांबळे, वैद्यकीय अधिकारी सीमा नेताम उपस्थित होते.