स्थायी समितीत नियुक्तीसाठी नगरसेवकांची मोर्चेबांधणी
By admin | Published: January 4, 2016 12:10 AM2016-01-04T00:10:06+5:302016-01-04T00:10:06+5:30
महापालिकेत मलईदार समिती म्हणून नावारुपास आलेल्या स्थायी समितीत नियुक्ती मिळावी,..
नेत्यांची मनधरणी सुरु : विद्यमान आठ सदस्य मार्चमध्ये समितीतून बाहेर
अमरावती : महापालिकेत मलईदार समिती म्हणून नावारुपास आलेल्या स्थायी समितीत नियुक्ती मिळावी, यासाठी नगरसेवकांनी नेत्यांची मनधरणी सुरू केली आहे. या सत्रातील हे शेवटचे वर्ष असून बहुतांश नगरसेवकांना स्थायी समितीत प्रवेशाचे वेध लागले आहे.
विद्यमान स्थायी समितीचा कार्यकाळ ९ मार्च २०१६ पर्यंत राहणार आहे. सभापती विलास इंगोले यांच्यासह ८ सदस्यांचा नियमानुसार दोन वर्षांचा कार्यकाळ संपत असल्याने ते स्थायी समितीतून बाहेर पडतील. आठ सदस्यांची नियुक्ती फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या सर्वसाधारण सभेत केली जाणार आहे. मात्र नवीन वर्ष सुरु होत नाही तेच नगरसेवकांनी स्थायी समितीत नियुक्तीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. स्थायी समितीत प्रवेशासाठी काँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या लांबलचक आहे. मात्र स्थायी समितीतून जेवढे सदस्य बाहेर पडतील तेवढेच सदस्य पुन्हा पाठवावे लागेल. गटनेत्यांनी दिलेल्या पत्रानुसार जे नावे देतील तेच नावे महापौर वाचन करुन स्थायी समितीचे सदस्य म्हणून पाठविले जातील. महापालिकेत स्थायी समितीला अनन्य साधारण महत्व आहे. आर्थिक विषयांचे सर्वच अधिकार या समितीला मुंबई महापालिका अधिनियमाने बहाल केले आहे. त्यामुळे महापालिकेत नगरसेवकपदी निवडून आलेल्यांना या समितीत प्रवेशाचा मोह आवरत नाही. येत्या २०१७ मध्ये महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या सामोरे जावे लागत असल्याने नगरसेवकांना ‘फुल नाही तर फुलाची पाकळी’ मिळावी या आशेने स्थायी समितीत प्रवेशासाठी नेत्यांकडे लॉबिंग सुरु केले आहे. काँग्रेसकडे इच्छुकांची संख्या अधिक असल्यामुळे कोणाला स्थायी समितीत पाठवावे, हे आतापासूनच पक्षनेता बबलू शेखावत यांच्यासाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. तर राष्ट्रवादी फ्रंट या गटाचे नेतृत्व अविनाश मार्डीकर यांच्याकडे असली तरी काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खोडके यांचाच शब्द या गटासाठी प्रमाण मानला जातो. संजय खोडके ठरवतील, त्याच नगरसेवकाला स्थायी समितीत पाठविले जाणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी असे प्रत्येकी दोन सदस्य स्थायी समितीत नियुक्त केले जाणार आहे. भाजप, सेना, रिपाइं-जनविकास फ्रंट व बसपा असे प्रत्येकी एक सदस्य स्थायी समितीत नियुक्ती केले जातील. स्थायी समितीत आठ सदस्य नव्याने पाठवावे लागणार आहे.