नगरसेविकांच्या पतींनी घेतली स्वच्छतेची शपथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 12:03 AM2017-12-04T00:03:06+5:302017-12-04T00:03:44+5:30
स्वच्छ सर्वेक्षण २०१८ च्या अनुषंगाने नगरसेविकांच्या पतींनी स्वच्छतेची शपथ घेतली. त्याअनुषंगाने या पती महाशयांच्या जबाबदारीत शतपटीने वाढ झाली आहे.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : स्वच्छ सर्वेक्षण २०१८ च्या अनुषंगाने नगरसेविकांच्या पतींनी स्वच्छतेची शपथ घेतली. त्याअनुषंगाने या पती महाशयांच्या जबाबदारीत शतपटीने वाढ झाली आहे. नगरसेविका पतीच्या खांद्याला खांदा लावून त्यांना आता स्वच्छतेचा आग्रह धरावा लागणार आहे. त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षणातील यशाचा मार्ग सुकर झाल्याची प्रतिक्रिया सत्ताधीशांमध्ये उमटली आहे.
स्वच्छ सर्वेक्षणाचे ब्रँड अॅम्बेसिडर भारत गणेशपुरे यांनी ३० नोव्हेंबरला दुपारी ४ च्या सुमारास महापालिकेतील डॉ.आंबेडकर सभागृहात सर्वपक्षीय नगरसेवकांशी संवाद साधला. मात्र या संवादपर्वाला बहुतांश नगरसेवकांनी हजेरी न लावल्याने त्यांची कसर नगरसेविकांच्या पतीने भरून काढली. महापालिकेतील ज्येष्ठ नगरसेवकांसाठी राखीव असलेल्या पहिल्या रांगेत या नगरसेविकांच्या पतींनी खुर्च्या पटकावल्या. मुळात गणेशपुरे यांच्यासमोर सभागृह भरल्यासारखे दिसावे, यासाठी प्रशासनानेही नगरसेविकांच्या पतींना ससन्मान पहिल्या व दुसºया रांगेत बसविले. हा कार्यक्रम नगरसेवकांसाठी असताना भाजपच्या नगरसेविका प्रमिला जाधव यांचे पती गजानन जाधव हे पहिल्या रांगेतील खुर्चीत जावून बसले. राजू कुरील, सुनील जावरे या नगरसेविका पतींनीही सभागृहात उपस्थित राहून सजग अमरावतीकरांची प्रतिमा उंचावली. गजानन जाधव थेट बबलू शेखावत आणि विलास इंगोले पहिल्या रांगेतील ज्या खुर्चीवर बसतात, तेथे स्थानापन्न झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र ते सत्तेतील नगरसेविकांचे पती असल्याने त्यांना हटकण्याची कुणाचीही बिशाद झाली नाही. काहींनी खासगीत नगरसेविकांच्या पतींची सभागृहातील उपस्थितीबाबत नाराजी दर्शविली. आमच्यामुळे प्रशासन व सत्ताधिशांची बूज राखल्या गेल्याचा दावा करण्यात आला. उपस्थिती दर्शविण्यासाठी महापालिकेच्या बहुतांश कर्मचाºयांना सभागृहात बोलावले.
शपथ अन् मार्गदर्शनही
शहर स्वच्छ राहावे आणि स्वच्छ सर्वेक्षणात शहर अग्रमानांकित व्हावे, यासाठी ब्रॅन्ड अॅम्बेसिडर भारत गणेशपुरे यांनी नगरसेवकांना धडे दिले. त्या दरम्यान स्वच्छतेची शपथ देण्यात आली. नगरसेविकेचे पती गजानन जाधव, सुनील जावरे, राजू कुरील यांनीही शपथ घेतली. स्वच्छतेविषयक मार्गदर्शन ऐकले. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या तुलनेत या नगरसेविका पतींची नैतिक जबाबदारी वाढली आहे.