महापालिका उपअभियंत्याला नगरसेविकेच्या मुलाची मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:08 AM2017-07-20T00:08:05+5:302017-07-20T00:08:05+5:30
रूख्मिणीनगर प्रभागातील रस्ता आणि भुयारी गटारच्या कामावरून उद्भवलेल्या वादातून महापालिकेच्या उपअभियंत्याला नगरसेविकेच्या पुत्राने मारहाण केली.
रुख्मिणीनगरातील घटना : अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : रूख्मिणीनगर प्रभागातील रस्ता आणि भुयारी गटारच्या कामावरून उद्भवलेल्या वादातून महापालिकेच्या उपअभियंत्याला नगरसेविकेच्या पुत्राने मारहाण केली. ही घटना रूख्मिणीनगरातील सुयोग मंगल कार्यालयासमोर घडली. यामुळे महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त करीत बुधवारी कामबंद आंदोलनाचा पवित्रा घेऊन आयुक्तांच्या कक्षासमोरच ठिय्या दिल्याने खळबळ उडाली.
याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी भाजप नगरसेविका जयश्री डहाके यांचा मुलगा अंकुश डहाकेविरूद्ध गुन्हा नोंदविला आहे. माहितीनुसार भुयारी गटार योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व लोकनिर्माण विभागाकडून करण्यात येत आहे. या खोदकामामुळे काळी माती रस्त्यावर पसरून पावसामुळे चिखल होत आहे. त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मातीवरून घसरून वाहन चालक अपघातग्रस्त झाले आहेत.
नगरसेवकांनी केली मध्यस्थी
या समस्येमुळे नगरसेवक प्रदीप हिवसे आणि महिला नगरसेविका जयश्री डहाके यांनी महापालिकेचे अभियंता जिवन सदार यांना उपाययोजना करण्यास सांगितले होते. दरम्यान मंगळवारी शहरात जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे रस्त्यावर पसरलेल्या मातीवरून घसरून काही वाहनचालक जखमी झालेत.
याघटनेमुळे नगरसेवक हिवसे यांनी महापालिका आयुक्त हेमंत पवार यांच्याशी संपर्क करून अभियंत्यांना घटनास्थळी पाठविण्यास सांगितले. त्यानुसार उपअभियंता सुहास चव्हाण यांना घटनास्थळी पाठविण्यात आले. रस्त्याच्या दुर्दशेच्या कारणावरून अंकुश डहाके व अभियंता चव्हाण यांच्यामध्ये शाब्दीक वाद झाला. याच वादात अंकुशने अभियंता चव्हाण यांना मारहाण करून धमकी दिली. याघटनेची तक्रार अभियंता चव्हाण यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात नोंदविली असून पोलिसांनी अंकुश डहाकेविरूद्ध भादंविच्या कलम ३५३, ३३२, ५०६ अन्वये सरकारी कामात अडथळा निर्माण करून मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
अभियंता चव्हाण यांना मारहाण केल्याची माहिती महापालिका वर्तुळात पसरताच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला. कामकाज बंद करून त्यांनी कार्यालये बंद केली आणि नगरसेविकेच्या मुलावर कारवाईची मागणी रेटून धरली. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महापालिका आयुक्त हेमंत पवार यांच्या कक्षासमोर ठिय्या दिला.
भाजप नगरसेविकेच्या मुलाने उपअभियंता सुहास चव्हाण यांना मारहाण केल्याची तक्रार राजापेठ ठाण्यात नोंदविताना भाजपचे स्थायी समिती सभापती तुषार भारतीय, चेतन गावंडे, पक्षनेता सुनील काळे, प्रदीप हिवसेंसह अन्य काही नगरसेवकांनी चव्हाण यांना समजाविण्याचे प्रयत्न सुरु केले होते. मात्र, चव्हाण यांनी पोलिसांत तक्रार दिली.