शौचालय कामात भ्रष्टाचार, चौकशीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 11:59 PM2018-04-04T23:59:23+5:302018-04-04T23:59:23+5:30
अचलपूर पंचायत समितीमध्ये बुधवारी सकाळी १०.१५ वाजता जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दत्ता ढोमणे यांनी भेट दिली. या भेटीत अधिकारी-कर्मचारी लेटलतीफ आढळून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : अचलपूर पंचायत समितीमध्ये बुधवारी सकाळी १०.१५ वाजता जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दत्ता ढोमणे यांनी भेट दिली. या भेटीत अधिकारी-कर्मचारी लेटलतीफ आढळून आले. त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश ढोमणे यांनी खंडविकास अधिकाऱ्यांना दिले. शौचालय कामात भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने सदर कामांच्या चौकशीचे आदेश त्यांनी दिले.
अचलपूर पंचायत समितीला दत्ता ढोमणे यांनी भेट देताच कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. घाईने कर्मचारी कार्यालयात एक एक होत पोहोचू लागले. कार्यालयात न पोचलेल्या अधिकाऱ्यांना मोबाईलद्वारे उपस्थित कर्मचाºयांनी लवकर येण्याचा निरोप दिला. ११.३० वाजोपर्यंत १५ अधिकारी-कर्मचारी लेटलतीफ आढळले. रोजच्या कामात तालुक्यातील आदिवासी भागात सुरू असलेल्या रोहयोच्या कामावरील गौण खनिजच्या रॉयल्टी पावत्या दाखविण्याचे आदेश त्यांनी दिले.
शौचालयाचे पैसे परस्पर काढले
तालुक्यातील शौचालयाच्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली आहे. लाभार्थ्याला शौचालय मंजूर झाल्याची माहिती न देता त्याची रक्कम परस्पर काढण्यात आल्याच्या तक्रारी आपणास प्राप्त झाल्याचे उपाध्यक्ष दत्ता ढोमने यांनी सांगितले. शौचालय लभार्थ्यांची रक्कम संबंधितांनी सदर सचिवाला देऊन शौचालयाची कामे ठेकेदारी पद्धतीने नियमबाह्य केली आहे.
उपाध्यक्ष सकाळी १० वाजता कार्यालयात आले असता १५ अधिकारी-कर्मचारी उशिरा आल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
- बाळासाहेब रायबोले,बीडीओ, पंचायत समिती, अचलपूर