कापूस @ ५ हजार
By Admin | Published: December 30, 2015 01:22 AM2015-12-30T01:22:30+5:302015-12-30T01:22:30+5:30
देशासह परदेशातही कापसाचे घटलेले उत्पादन, गुजरात सरकारने कापसाला दिलेला ५५० रूपये बोनस, ...
अमरावती : देशासह परदेशातही कापसाचे घटलेले उत्पादन, गुजरात सरकारने कापसाला दिलेला ५५० रूपये बोनस, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल, ढेप, सरकीचे वधारलेले भाव या पार्श्वभूमिवर कापसाची मागणी वाढल्याने खुल्या बाजारात कापसाला मंगळवारी यंदाचा सर्वाधिक ५ हजार रूपये क्विंटल भाव मिळाला आहे.
दक्षिण भारतात अती पाऊस तसेच पंजाब, हरियाणा व गुजरात राज्यात कमी पावसामुळे कापसाचे उत्पादन घटले आहे.
पांढऱ्या सोन्याची गुजरातेत विक्री
अमरावती : यंदा कापसाचे उत्पादनात ३० ते ३५ लाख क्व्ािंटलने घट येण्याची शक्यता आहे. कमी उत्पादनामुळे गुजरातमधील कापसावर आधारित उद्योगांना कापसाचा पुरवठा कमी होणार असल्याच्या पार्श्वभूमिवर गुजरात सरकारने कापसाला प्रतिक्विंटल ५५० रूपये बोनस जाहीर केला आहे. यामुळे जिल्ह्यातील खुल्या बाजारात खासगी व्यापाऱ्यांनी कापसाची दरवाढ करून कापूस खरेदीचा सपाटा सुरू केला आहे. जिल्ह्यातील पांढरे सोने आता गुजरातमध्ये विकले जात आहे.
अमेरिकेतील टेक्सास प्रांतात कापसाचे उत्पादन घटले आहे. पाकिस्तानात कापसाची मागणी वाढली आहे. त्यामुळे प्रथमच डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात कापसाला ४१०० रूपयांपेक्षा अधिक हमीभाव मिळायला सुरुवात झाली व शासकीय खरेदी केंद्र ओस पडले आहेत.
पाकिस्तानमध्ये पुराचा फटका बसल्याने यंदा मागील १० वर्षांच्या तुलनेत सर्वात कमी उत्पादन होणार आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणात कापूस निर्यातीची संधी भारताकडे चालून आली आहे. यंदाच्या कापूस विपणन हंगामात भारताने आतापर्यंत २० ते २२ लाख कापसाच्या गाठी निर्यातीचे करार केले आहेत. यापैकी ५० टक्के गाठी पाकिस्तानात निर्यात केली जाणार आहेत, असे अभ्यासकांनी सांगितले.