शासकीय खरेदीच्या विलंबाने पांढऱ्या सोन्याला कवडीमोल दर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2024 03:25 PM2024-11-21T15:25:47+5:302024-11-21T15:26:43+5:30
Amravati : जिल्हाभरात एकच केंद्र सुरू; खेडा खरेदीत शेतकऱ्यांची लूट
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : प्रत्येक तालुक्यात कापसाची खरेदी करण्यात येणार असल्याचे सीसीआयने जाहीर केले असले तरी जिल्ह्यात मात्र सात दिवसांपूर्वी सात केंद्रे सुरू झाली. १५ दिवसांपूर्वी फक्त एक केंद्र धामणगावला सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे कापसाला हमीभाव तर दूर, खेडा खरेदीमध्ये कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.
कपाशी हे जिल्ह्याचे खरीप हंगामातील प्रमुख पीक आहे. यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पावसाने कपाशीचे नुकसान झाल्याने कापसाचे सरासरी उत्पादन कमी येत आहे. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आहेच, शिवाय सततच्या पावसाने कपाशीची बोंडसड झाली आहे. लाल्याने दोन वेच्यात उलंगवाडी होईल, अशी स्थिती आहे. वेचणीसाठी मजूर मिळत नाहीत, निवडणुकीमुळे कामगारांचा तुटवडा आहे. वेचणीचा दर किलोमागे १० रुपयांवर गेला आहे. त्यातुलनेत कापसाला सात हजारांपर्यंत भाव मिळत आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही शेतकऱ्यांच्या पदरी पडणार की नाही, अशी शंका शेतकरी व्यक्त करीत आहेत.
भारतीय कापूस महामंडळाद्वारा ५ नोव्हेंबरला धामणगाव रेल्वे येथे कापूस खरेदी केंद्र सुरू केले. येथे आतापर्यंत ५०० क्विंटलपर्यंत कापसाची खरेदी करण्यात आली. अन्य तालुक्यात अद्याप केंद्र सुरू झालेली नाहीत. आठ दिवसांपूर्वी दर्यापूर, येवदा, दर्यापूर, भातकुली, वरूड, नांदगाव पेठ, अंजनगाव सुर्जी येथे सीसीआयचे केंद्र सुरू करण्यात आले तर चांदूरबाजार प्रस्तावित असल्याची माहिती आहे. दरम्यान शासन खरेदीला विलंब व विधानसभा निवडणूक प्रचार यासर्व कारणांमूळे आर्थिक अडचणीतील शेतकरी मिळेल त्या भावात कापूर विकत आहे.
१२ क्विंटलची मर्यादा, आर्द्रतेचा निकष
- सीसीआय केंद्रांवर कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना पहिली नोंदणी करावी लागते. यासाठी सातबारा, आधार कार्ड महत्त्वाचे आहे व आधारलिंक असलेल्या खात्यामध्येच पेमेंट जमा केले जाते. यावेळी खरेदीसाठी एकरी १२ क्चिटलची मर्यादा आहे.
- कापसामध्ये किमान ८ ते १२ टक्के आर्द्रता व एफएक्यू दर्जा ही प्रमुख अट आहे. ८ टक्के आर्द्रता असेल, तर ७,५२१ रुपये क्विंटल हा हमीभाव मिळतो. मात्र, आर्द्रता एक टक्क्याने वाढल्यास क्विंटलमागे हमीदराच्या एक टक्का दर कमी होत जातो.
निवडणुकीमुळे वेचणीला मजूर मिळेनात
शेतीच्या कामांसाठी पहिलेच मजुरांची कमतरता आहे. अशातच विधानसभा निवडणुकीचे धुमशान सुरू असल्याने कापूस वेचणीला मजूर मिळत नसल्याचे शिवारातील चित्र आहे. त्यातच कापूस वेचणीचे दर आताच १० रुपये किलोवर पोहोचले आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी कुटुंब शेतात स्वतः राबताना दिसत आहेत.