दिवाळीपूर्वी पांढरे सोने शेतकऱ्यांच्या घरात, कापूस वेचणीपूर्वीच्या सीतदहीला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2021 01:40 PM2021-10-29T13:40:47+5:302021-10-29T13:42:19+5:30
कापूस वेचणीला प्रारंभ करण्यापूर्वी बळीराजाकडून शेतात सीतादही उरकविण्याचे काम सुरू करण्यात आले.
अमरावती : दिवाळीच्या मुहूर्तावर घरी येणारा कापूस निसर्गाच्या अवकृपेने उशिरा का होईना शेतात दिसू लागला आहे. विदर्भातील शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळख असलेले कापूस पीक घरी आणण्याकरिता शेतकऱ्यांची तयारी सुरू झाली आहे.
कापूस वेचणीला प्रारंभ करण्यापूर्वी बळीराजाकडून शेतात सीतादही उरकविण्याचे काम सुरू करण्यात आले. कुणी कपाशीच्या शेतात झुला बांधून पूजा करून प्रसादाचे वाटप करतात. त्यानंतर कापूस काढण्यासाठी प्रारंभ करतात. पूर्व विदर्भात वेगवेगळ्या जिल्ह्यांत वेगवेगळ्या पूजेने कापूस वेचण्याचे काम सुरू झाले आहे. परंतु अवकाळी पावसामुळे कापसाच्याही उत्पादनात घट येणार आहे.
जिल्ह्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतातील कपारीची बोंड गळून पडली. पावसामुळे ओले झालेली बोंड सडली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची कपाशीचा भरघोस उत्पादनाची आशा मावळली आहे. यात काही शेतात कपाशीची बोंडे आता फुटू लागली आहेत. कापूस वेचण्याचे काम शेतकऱ्यांकडून सुरू झाले आहे. विदर्भात प्रमुख उत्पादन म्हणून कापसाकडे पाहिले जाते. कधी सोयाबीनच्या कमी-अधिक उत्पन्नामुळे कापसाचे क्षेत्र बदलत आले आहे.
गतवर्षी मिळालेल्या वाढत्या दरामुळे शेतकऱ्यांकडून कापसाचे क्षेत्र कायम ठेवण्यात आले आहे. प्रारंभी विलंबाने आलेल्या पावसामुळे कपाशीची लागवड उशिराने झाली. कापूस निघण्याच्या काळात आलेल्या परतीच्या पावसाने शेतात उभी असलेली पहाटी झोडपून काढली. या सर्व परिस्थितीत शेतात असलेला कापूस वेचण्याचे काम शेतकऱ्यांकडून सुरू झाले आहे. कापूस काढणीला प्रत्यक्षात प्रारंभ करण्यापूर्वी परंपरेनुसार शेतकऱ्यांकडून शेतात सीतादही करण्यात येते. सध्या कापसाच्या शेतात बळीराजा या कामात व्यस्त असल्याचे दिसत आहे. त्यामुळे कापसाच्या शेतात वेगवेगळ्या प्रकारची पूजापाठ कापूस वेचण्यापूर्वीच सुरू झाली आहे.