दहा हजार शेतकऱ्यांकडील पांढरे सोने घरातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 12:12 PM2018-11-27T12:12:49+5:302018-11-27T12:13:24+5:30

धामणगाव रेल्वे तालुक्यात अल्प पाऊस, त्यातच लागणारा खर्च अधिक असल्यामुळे भाववाढीच्या अपेक्षेत तालुक्यातील दहा हजार शेतकऱ्यांच्या घरी आजही पांढरे सोने पडून आहे.

Cotton remain stored at ten thousand farmers | दहा हजार शेतकऱ्यांकडील पांढरे सोने घरातच

दहा हजार शेतकऱ्यांकडील पांढरे सोने घरातच

Next
ठळक मुद्देखर्च अधिक, उत्पन्न अल्प

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: धामणगाव रेल्वे तालुक्यात अल्प पाऊस, त्यातच लागणारा खर्च अधिक असल्यामुळे भाववाढीच्या अपेक्षेत तालुक्यातील दहा हजार शेतकऱ्यांच्या घरी आजही पांढरे सोने पडून आहे. दरम्यान, पुन्हा बोंडअळीने आक्रमण केल्याने फरदडीचा कापूस घेण्याची आशा मावळली आहे.
यंदा तालुक्यात केवळ ११ ते १३ जूनदरम्यान पाऊस झाला. यावेळी कपाशीची पेरणी करण्यात आली. त्यातच जिराईत शेतीत तर कापसाचे उत्पन्नच आले नसल्याचे दिसून येत आहे. आधारभूत किमतीत शेतकरी कापसाचे बोंडही विकायला तयार नसल्याने शेतकऱ्यांच्या घरात ढीग ‘जैसे थे’ आहे. व्यवहाराअभावी शेतकऱ्यांचे अर्थचक्र ठप्प झाले आहे. कापसासाठी बियाणे, खताचे तीन डोज, आठ हजार रुपये फवारणी, वेचाई अधिक अन्य खर्च धरून चाळीस हजार रुपये येत असताना हाती फक्त २० हजार रुपये येतात. त्यामुळे कपाशी पुढच्या वर्षी पेरायची की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. धामणगाव शहर पूर्वी कापसाची बाजारपेठ म्हणून ओळखली जायची. बदलत्या काळात कापूस नाममात्र राहिला आहे. शासकीय हमीभाव ५४५० रुपये, तर खाजगीत ५९०० रुपये मिळत असल्याने खाजगी खरेदीला अधिक महत्त्व दिले आहे. त्यातही विक्रीस येणाऱ्या कापसाला हलक्या प्रतीचा ठरवत व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी त्यांचा कापूस घरीच भरून ठेवला आहे. मागील आठवडाभरात कापसाची विक्री ५९०० रुपये प्रतिक्विंटल अशा दराने केली गेली. या दरात चारशे रुपये घटल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आले आहे. ज्या शेतकऱ्यांकडे विहीर, बोअर अशी व्यवस्था आहे, ते ओलितावर कपाशीच्या फरदडीचे उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न करत असताना, या बोंडावर पुन्हा शेंदरी बोंडअळी आली आहे. किमान दहा हजार रुपये प्रतिक्विंटल हमीभाव शासनाने तेव्हा शेती परवडेल, अशी प्रतिक्रिया तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

Web Title: Cotton remain stored at ten thousand farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.