घरात साठवलेला कापूस ठरत आहे आरोग्यास घातक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 07:15 PM2020-04-18T19:15:09+5:302020-04-18T19:17:24+5:30
लॉकडाऊनमुळे कापसाची खरेदी संपूर्णत: बंद असून हजारो क्विंटल कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. परंतु या कापसाचे दुष्परिणाम आता दिसू लागले आहे. कापसामुळे घरात राहणाºया व्यक्तींना खाज सुटली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: लॉकडाऊनमुळे कापसाची खरेदी संपूर्णत: बंद असून हजारो क्विंटल कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. परंतु या कापसाचे दुष्परिणाम आता दिसू लागले आहे. कापसामुळे घरात राहणाºया व्यक्तींना खाज सुटली आहे. अंगावर लाल गुंता येऊ लागल्या आहेत. त्यामुळे शासनाने तात्काळ कापसाची खरेदी सुरू करावी, अशी मागणी व तक्रार शेतकरी विजय मुंडाले यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक व थेट मुख्यमंत्र्यांकडे नुकतीच केली आहे.
कोरोना इफेक्टमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. दरवर्षी हंगाम संपल्यावर कापसाचे भाव वाढतात, असा अंदाज बांधून शेतकºयांनी मध्यंतरी कापूस विक्रीस काढला नाही. मात्र, ऐनवेळी कोरोनाचे सावट पसरल्याने कापूस उत्पादकांची कोंडी झाली. परंतु हे मोठे संकट असल्याने परिसरातील शेतकरी लॉकडाऊनचे काटेकोर पालन करीत आहे. कोरोनाचा प्रादुभाव थांबावा म्हणून शेतमाल बाजार पेठेत जावा, अशी अपेक्षा शेतकरी करीत आहेत. परंतु लॉकडाऊन आणखी वाढल्याने कापूस किती दिवस घरात ठेवावे लागणा, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. वाढत्या तापमानात कापसाच्या गंजीला आग लागण्याची भिती, तसेच घरातील सदस्यांना खाज सुटली असून, अंगावर लाल चट्टे येऊ लागली आहेत. त्यामुळे आधीच कोरोनामुळे नागरिक भयभित असताना या कापसामुळे आणखी एखादा रोग तर उदभवणार नाही ना, अशी शंका शेतकऱ्यांच्या मनात घर करीत आहे.