अंगणवाडी सेविकांना कुपोषणमुक्ती शक्य?
By admin | Published: October 11, 2014 10:57 PM2014-10-11T22:57:34+5:302014-10-11T22:57:34+5:30
अंगणवाडीतील बालकांचे आरोग्य उत्तम राहावे, यासाठी राज्य सरकारने विविध उपक्रमांची अंमलबजावणी केली आहे. याअंतर्गत मूठभर धान्य योजनेच्या माध्यमातून बालकांच्या प्रकृतीची काळजी घेणे
अमरावती : अंगणवाडीतील बालकांचे आरोग्य उत्तम राहावे, यासाठी राज्य सरकारने विविध उपक्रमांची अंमलबजावणी केली आहे. याअंतर्गत मूठभर धान्य योजनेच्या माध्यमातून बालकांच्या प्रकृतीची काळजी घेणे व यातून कुपोषण टाळणे, हे काम आता अंगणवाडी सेविकांकडे सोपविले आहे. आधीच कामाचा ताण व त्यामध्ये नवीन योजनेची जबाबदारी याविषयी अंगणवाडी सेविकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
कुपोषणाचे समूळ उच्चाटन व्हावे यासाठी शासनाने मूठभर धान्य योजना आणली आहे. गावात फिरुन सेविकांना हे धान्य जमवायचे आहे. यापासून पोषाहार शिजवून बालकांना तो द्यायचा आहे. यासोबतच योजनेचे महत्त्व ग्रामस्थांना समजावून सांगणे, त्यांचे सहकार्य घेणे शासनाला अभिप्रेत यामुळे अध्ययनाच्या कामावर त्याचा परिणाम होणार आहे. राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात २३०० अंगणवाडीमधील बालकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येते. जिल्ह्यात ० ते ६ वयोगटातील सुमारे १ लाखावर बालके आहेत. यापैकी ५ हजारांवर बालके कुपोषणाच्या विविध स्टेजमध्ये आहेत. जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने हे प्रमाण कमी असले तरी चिंताजनक आहे. प्रकृतीने अशक्त असलेल्या मुलांना पोषक अन्नपदार्थ सध्या अंगणवाडीमधून पुरविले जात आहेत. या मुलांच्या आरोग्याचीही नियमित तपासणी करण्यात येते. या बालकांसाठी आवश्यक तो खाऊ अंगणवाडीत ठेवला जातो. ही सर्व कामे अंगणवाडी सेविकांना करावी लागतात. त्यामध्ये आता मूठभर धान्य योजनेची भर पडल्याने गावागावांत गटागटाचे राजकारण असून या योजनेला ग्रामस्थांचे कितपत सहकार्य मिळेल, त्यावर या योजनेचे भवितव्य अवलंबून राहील.