यवतमाळात ७ डिसेंबरला कापूस उत्पादकांची परिषद; शेतकऱ्यांवरील अस्मानी व सुलतानी संकटांवर काढणार तोडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 11:53 AM2017-12-06T11:53:05+5:302017-12-06T11:54:57+5:30
गुलाबी बोंडअळीचे लगतच्या तेलंगणा राज्यात आलेल्या संकटाने आता विदर्भ व मराठवाड्यात, मध्यप्रदेश, गुजरात व्यापले. दशकात प्रथमच आलेल्या संकटावर मात करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी यवतमाळ येथे ७ डिसेंबर रोजी कापूस उत्पादक शेतकरी परिषदेचे आयोजन आहे.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : गुलाबी बोंडअळीचे लगतच्या तेलंगणा राज्यात आलेल्या संकटाने आता विदर्भ व मराठवाड्यात, मध्यप्रदेश, गुजरात व्यापले. दशकात प्रथमच आलेल्या संकटावर मात करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी यवतमाळ येथे ७ डिसेंबर रोजी कापूस उत्पादक शेतकरी परिषदेचे आयोजन आहे.
शेतकरी मिशन, कृषी विभाग, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व त्यांच्याशी जुळलेले महाविद्यालये, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्व. जवाहरलाल दर्डा सभागृहात एक दिवसीय कार्यशाळा व शेतकरी परिषद आयोजित केली आहे. यामध्ये गुलाबी बोंडअळीच्या अभूतपूर्व संकटावर तोडगा व पर्याय काढणे, गुलाबी बोंडअळीचा विषय केंद्रात व राज्यात रेटून शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई मिळावी व गुलाबी बोंडअळीच्या संकटातून कायम सुटका व्हावी, यासाठीचे ठराव व प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येतील. बोंडअळीची समस्या निवारणासाठी परिषदेत शास्वत शेतीचे अभ्यासक प्रकाश पोहरे, जैविक शेतीचे प्रणेते मनोहरराव परचुरे, केंद्रीय कापूस अनुसंधान परिषदेचे संशोधक, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे सल्लागार, कृषी विभागाचे अधिकारी मार्गदर्शन करतील, अशी माहिती शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिली.
संकटाचे कारण शोधणार
बोंडअळी समस्या निवारणासाठी कापूस उत्पादक कृषी क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्व संस्था, शेतकरी, शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते, बियाणे उत्पादकांचे प्रतिनिधी आदी एकाच व्यासपीठावर तोडगा काढणार आहेत. गुलाबी बोंडअळीच्या संकटाचे मूळ कारण, त्यावर चिंतन व तोडगा काढण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी कार्यशाळेद्वारे प्रयत्न होणार आहे.