नगरसेवक, पालिका प्रशासनाचा वाद पोलिसांत
By admin | Published: April 9, 2015 12:25 AM2015-04-09T00:25:28+5:302015-04-09T00:25:28+5:30
आठवडाभरापासून या ना त्या कारणावरून चांदूरबाजार पालिका प्रशासन व नगरसेवकांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे...
सीसीटीव्ही फुटेज चोरले : सहायक अधीक्षक, अभियंत्याविरुद्ध तक्रार
चांदूरबाजार : आठवडाभरापासून या ना त्या कारणावरून चांदूरबाजार पालिका प्रशासन व नगरसेवकांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर चोरीचे आरोप लावल्याने आता नवा वाद निर्माण झाला आहे. हा वाद आता थेट पोलिसांत पोहोचल्यामुळे पोलीस प्रशासनासमोर नेमकी कोणावर कारवाई करावी, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
चांदूरबाजार पालिकेचे सहायक अधीक्षक विजय जयस्वाल यांनी ७ एप्रिलला दुपारी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार ४ एप्रिल रोजी दुपारी १२.३० ते ४ वाजताच्या दरम्यान शिक्षण सभापती गोपाल तिरमारे व एजाज अलीसह इतर आंदोलनकर्त्यांनी पालिकेच्या दालनातील सीसीटीव्हीचे डीव्हीआर चोरून नेल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली. याची दखल घेत पोलिसांना दोन नगरसवकांसह आंदोलनकर्त्यांवर कलम ४५४, ३८० (३४) अन्वये गुन्हा दाखल केला. ७ एप्रिललाच सायंकाळच्या सुमारास आंदोलनकर्ते नगरसेवक गोपाल तिरमारे आणि एजाजअली यांनी नगरपरिषदेतील कार्यरत सहायक कार्यालय अधीक्षक विजय जयस्वाल व बांधकाम अभियंता करीम यांनीच सीसीटीव्हीचे फुटेज गायब केल्याची तक्रार नोंदवून गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
मागील दोन महिन्यांपासून रिक्त असलेल्या मुख्याधिकारीपदावर मंगळवारी पहिल्या महिला मुख्याधिकारी म्हणून मेघना वासनकर यांनी पदभार सांभाळला. पहिल्याच दिवशी त्यांना या वादाला सामोरे जाण्याची वेळ आली. विरोधी तक्रारीमुळे पोलीस प्रशासनावरही कारवाई नेमकी कोणावर करावी, असा प्रश्न निर्माण झाल्यामुळे पोलिसांनी हे प्रकरण चौकशीत ठेवल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून प्राप्त झाली. (तालुका प्रतिनिधी)
संभ्रमावस्थेत टाकणारे प्रश्न
ज्या दिवशी सभागृहात नगरसेवकांचे उपोषण सुरू होते, त्यावेळी नागरिकांचा मोर्चा पालिकेवर धडकला. याच दिवशी सीसीटीव्ही साहित्य चोरून नेल्याचा आरोप या नगरसेवकांसह आंदोलनकर्त्यांवर करण्यात आला. नेमके याच दिवशी आंदोलनकर्त्यांनी तोडफोड केल्याची तक्रारही पोलिसांत दाखल करण्यात आली. पोलिसांकडून या तक्रारीच्या अनुषंगाने घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. त्यात घटनास्थळी कोणतीही तोडफोड झाली नसल्याचे स्पष्ट झाले. असे असताना त्याच दिवशी सीसीटीव्ही साहित्य चोरीला गेल्याची तक्रार का देण्यात आली नाही? तसेच याच दिवशी पोलीस बंदोबस्तात उपोषणकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तेव्हापासून ७ एप्रिलपर्यंत आंदोलनकर्ते पोलिसांच्या निगराणीत सामान्य रूग्णालयात होते. ६ एप्रिललाही कार्यालयीन वेळेत ही तक्रार का दाखल करण्यात आली नाही? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
उपरोक्त तक्रारींमध्ये लोकप्रतिनिधी व शासकीय कार्यालयांचा उल्लेख असल्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतरच पुढील कारवाई करण्यात येईल.
- दिलदार तडवी,
ठाणेदार, चांदूरबाजार.