बडनेरात पुन्हा झळकला नगरसेवकांच्या निषेधाचा फलक
By admin | Published: October 5, 2016 12:18 AM2016-10-05T00:18:29+5:302016-10-05T00:18:29+5:30
कंपासपुऱ्यातील हनुमान मंदिरासमोरून जाणाऱ्या मार्ग पेव्हिंग ब्लॉक उखडल्यामुळे वर्षभरास येथे भला मोठा खड्डा पडला आहे.
खड्डा बुजविणार केव्हा ? : आठवडाभरातील दुसरा प्रकार
बडनेरा : कंपासपुऱ्यातील हनुमान मंदिरासमोरून जाणाऱ्या मार्ग पेव्हिंग ब्लॉक उखडल्यामुळे वर्षभरास येथे भला मोठा खड्डा पडला आहे. नागरिकांना यामुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. परिसरवासीयांनी या खड्ड्याच्या ठिकाणी नगरसेवकांच्या निषेधार्थ फलक लावून नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. प्रभाग क्र. ४१ मधील कंपासपुऱ्यातील हनुमान मंदिराजवळच्या मैदानात दोन वर्षांपासून रखडलेल्या काँक्रीटीकरणाच्या विरोधात अंबाई नवरात्र महोत्सव समिती व कंपासपुऱ्यातील नागरिकांनी घट स्थापनेच्या दिवशी नगरसेवकांच्या नावे निषेध नोंदविणारे फलक लावले होते. तोच दोन दिवसानंतर येथून जवळच असणाऱ्या रस्त्यावरील खड्ड्यांच्या मनस्तापाला कंटाळून दुसरे निषेधाचे फलक लावण्यात आले. दोन नगरसेवकांच्या आपसी मतभेदांनी प्रभागाचा विकास रखडला. शिवरात्री, हनुमान जयंती, गणपती, नवरात्र महोत्सवही संपलेत. आता विकास नवीन नगरसेवकच करणार का? अशा आशयाचे फलक लावण्यात आले. त्यात विनित म्हणून झोपलेल्या नगरसेवकांची जागृत जनता असेही लिहिेले आहे. ज्या मार्गावरचे काँक्रीटीकरण रखडले आहे. तसेच मोठा खड्डा निर्माण झाला आहे. तो मार्ग जुन्यवस्तीचा मुख्य मार्ग आहे. हा मार्ग महामार्गाला जोला आहे. यावरुन वाहतुकीची वर्दळ असते. मात्र या दोनही कामासंदर्भात या ठिकाणच्या नागरिकांनी आमदारांसह नगरसेवकांना वारंवार सुचविले आहे. शेवटी कंटाळून नागरिकांनी नगरसेवकांच्याच नावाने निषेधाचे फलक लावणे सुरू केले. आता आम्ही नगरसेवकांना कामासाठी तगादा लावणार नाही, असा पवित्रा नागरिकांनी घेतला आहे. यापुढे कोणत्याही नगरसेवकाने नागरिकांच्या समस्या तत्काळ निकाली न लावल्यास निषेधांचे फलकच झळकवू, असेही बोलल्या जात आहे. (शहर प्रतिनिधी)
बडनेऱ्यात रस्तेच पेव्हींग ब्लॉकचे
पेव्हींग ब्लॉकचाच रस्ता तयार करण्याचा अफलातून प्रकार बडनेऱ्यात दृष्टीस पडत आहे. मंदिरासमोर रस्त्याच्या दुतर्फा बगीच्यामधील रस्त्यांवर पेव्हिंग ब्लॉक बसविले आहे. बडनेरा शहरात रस्तेच पेव्हींग ब्लॉकने तयार करण्यात आले. हे यावरुन जड वाहतूक जात असते. एक पेवींग ब्लॉक सरकला की रस्ताच उखडतो, असेच काहीसे कंपासपुऱ्यात झाले. पेवींग ब्लॉक बसवू नये, अशी नागरिकांची मागणी असून सुद्धा या ठिकाणी पेवींग ब्लॉकचाच रस्ता बनविण्यात आलेला आहे. त्याचाच मनस्ताप नागरिकांना होतो आहे.