काऊंटडाऊन
By admin | Published: February 6, 2017 12:01 AM2017-02-06T00:01:54+5:302017-02-06T00:01:54+5:30
विधानपरिषदेच्या अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी सोमवार ६ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
सोमवारी सुरुवात : क्रीडा संकुलात पदवीधरची मतमोजणी
अमरावती : विधानपरिषदेच्या अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी सोमवार ६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. विभागीय क्रीडा संकुलात होणाऱ्या या मतगणनेमध्ये १३ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होईल.
३ फेब्रुवारी रोजी ‘पदवीधर’ची निवडणूक पार पडली. अमरावती, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ व अकोला या पाच जिल्ह्यातील १ लाख ३३ हजार ५८७ पदवीधर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची ही टक्केवारी ६३.४६ एवढी आहे. पाचही जिल्ह्यातील २८० मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आले असून बुलडाण्यात सर्वाधिक ६७.४४ टक्के मतदान झाले तर त्या खालोखाल यवतमाळला ६७.४१, वाशिम ६३.५८, अकोला ६३.४४ आणि अमरावती ५९.९४ अशी मतदानाची टक्केवारी आहे. पदवीधर मतदारसंघासाठी २ लाख १० हजार ५११ मतदारांची नोंदणी करण्यात आली होती. अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघासाठी १३ उमेदवार रिंगणात होते. अमरावती जिल्ह्यात ९१, अकोला ६६, यवतमाळ ४८, बुलडाणा ४६ तर वाशिम जिल्ह्यातील २९ मतदान केंद्रावर हे मतदान घेण्यात आले आहे. पदवीधरमध्ये झालेल्या मतदानात १ लाख ४० हजार ४१५ पुरुष मतदारांपैकी ९५ हजार ६४४ तर ७० हजार ९४ स्त्री मतदारांपैकी ३७ हजार ९४३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मतमोजणी मुख्य निवडणूक अधिकारी तथा विभागीय आयुक्त जे. पी. गुप्ता यांच्या मार्गदर्शनात होणार आहे.
३० टेबलवर मतमोजणी
३० टेबलवर ३०० कर्मचारी पदवीधरसाठी झालेल्या मतांची गणना करतील. पसंती क्रमांकानुसार मतपत्रिकांची विभागणी केल्या जाईल. एकूण वैध मतदानाच्या ५० टक्के अधिक १ मत या रितीने विजयी उमेदवारासाठी कोटा निश्चित करण्यात येईल व त्यानंतर पसंतीक्रमानुसार मतमोजणीला सुरुवात होईल.
नव्या आमदारांची मंगळवारी घोषणा
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची सोमवारी सकाळी ८ वाजता सुरु होणारी मतमोजणी मंगळवारी सकाळी १० वाजेपर्यंत सुरु राहण्याची शक्यता आहे. मतदान ईव्हिएमऐवजी बॅलेट पेपरच्या माध्यमातून करण्यात आल्याने मतमोजणी प्रक्रियेसाठी अधिकचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे नव्या आमदारांच्या नावाची घोषणा मंगळवारी सकाळी होण्याची शक्यता आहे.
१३ उमेदवारांचा होणार फैसला
रणजित पाटील (भाजप), संजय खोडके (काँग्रेस), दिलीप सुरोशे (प्राऊटिस्ट ब्लॉक इंडिया) नीता गहरवाल (रिपब्लिकन सेना) अरुण आंबेडकर, अविनाश चौधरी, गणेश तायडे, संतोष गावंडे, जितेंद्र जैन, दीपक धोटे, लतिश देशमुख , प्रशांत काटे, प्रशांंत वानखेडे (सर्व अपक्ष).
मतमोजणी परिसरात २०० मीटरच्या आत प्रवेशबंदी
कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने फौजदारी संहिता १९७३ चे कलम १४४ अंतर्गत मतमोजणी परिसरात २०० मीटरच्या आत ६ फेब्रुवारी ते मतमोजणी संपेपर्यत सामान्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. केवळ उमेदवारांचे प्राधिकृत प्रतिनिधी, मतमोजणी कर्मचारी, कर्तव्यार्थ नियुक्त पोलीस कर्मचाऱ्यांना प्रवेश मिळेल, असे आदेश उपविभागीय दंडाधिकारी इब्राहिम चौधरी यांनी काढले आहेत.
मतमोजणीवर सीसीटीव्हीची नजर
अमरावती: कोटा पूर्ण झाला नाही तर कमी मते घेतलेला उमेदवार स्पर्धेतून बाद केल्या जाईल. त्या उमेदवाराच्या मतपत्रिकेवर दुसरा पसंती क्रमांक असेल तर त्या उमेदवाराच्या खात्यात त्या मताची गणना केली जाते. विजयाकरिता आवश्यक मतांचा कोटा पूर्ण होईस्तोवर ही प्रक्रिया राबविली जाईल. विभागीय क्रीडा संकुलात ही मतमोजणी होणार असून किमान २४ तासांपेक्षा अधिक कालावधीपर्यंत ही प्रक्रिया सुरु राहील, असे संकेत आहेत. त्याअनुषंगाने संपूर्ण परिसरात सीसीटिव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. पोलीस, मतमोजणी अधिकाऱ्यांसाठी जेवण, फराळाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.प्रशासनाच्यावतीने विभागीय क्रीडा संकुल परिसरात मतमोजणी प्रतिनिधी, उमेदवारांसाठी कॅ न्टीनची व्यवस्था केली आहे. या कॅन्टीनमध्ये जेवण, फराळ, चहा, कॉफी विकत घेता येईल. मतमोजणीची प्रक्रिया पूर्णहोईस्तोवर कॅन्टीन सुरु राहील, अशी माहिती आहे.