प्रतियुती; सूर्य अन् गुरू ३ नोव्हेंबरला आमने-सामने, पृथ्वीपासूनचे सरासरी अंतरदेखील या काळात कमी
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: October 27, 2023 07:58 PM2023-10-27T19:58:29+5:302023-10-27T20:03:25+5:30
Amravati: ग्रहमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरू ३ नोव्हेंबरला अगदी सूर्यासमोर येत आहे. या घटनेला खगोलशास्त्रात प्रतियुती म्हणतात. या दिवशी गुरू-सूर्य आमनेसामने राहील. प्रतियुतीच्या काळात ग्रहाचे पृथ्वीपासूनचे सरासरी अंतर कमी असते.
- गजानन मोहोड
अमरावती - ग्रहमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरू ३ नोव्हेंबरला अगदी सूर्यासमोर येत आहे. या घटनेला खगोलशास्त्रात प्रतियुती म्हणतात. या दिवशी गुरू-सूर्य आमनेसामने राहील. प्रतियुतीच्या काळात ग्रहाचे पृथ्वीपासूनचे सरासरी अंतर कमी असते. या खगोलीय घटनेचा मानवी जीवनावर कोणताच परिणाम होणार नसल्याची माहिती खगोल अभ्यासकांनी दिली.
प्रतियुतीमधील काळ हा साधारण १३ महिन्यांचा असतो. याआधी २६ सप्टेंबर २०२२ रोजी गुरू-सूर्य प्रतियुती झाली होती. पृथ्वीपासून गुरूचे सरासरी अंतर ९३ कोटी किमी आहे. गुरूचा व्यास १,४२,८०० किमी आहे. या ग्रहाला सूर्याभोवती एक चक्कर मारण्यास ११.८६ वर्षे लागतात. गुरूला एकूण ७९ चंद्र आहेत. टेलिस्कोपमधून गुरूचे निरीक्षण केले असता गुरूवरचा पट्टा व चार चंद्र दिसतात. ७ डिसेंबर १९९५ रोजी मानवविरहित यान ‘गॅलिलिओ’ गुरूवर पोहोचले. गुरूवर जीवसृष्टी असल्याचा कोणताही पुरावा अजूनपर्यंत मिळालेला नाही.
\३ नोव्हेंबरला सूर्यास्तानंतर थोड्याच वेळात गुरू, ग्रह क्षितिजावर उगवेल आणि पहाटे पश्चिमेकडे मावळेल. हा ग्रह अत्यंत तेजस्वी दिसत असल्याने तो सहज ओळखता येईल व साध्या डोळ्याने पाहता येणार आहे. ग्रेट रेड स्पॉट, युरोपा, गॅनिमीड, आयोव कॅलेस्टो हे गुरूचे चार चंद्र मात्र साध्या डोळ्याने दिसू शकणार नाही. याकरिता टेलिस्कोपची आवश्यकता असल्याची माहिती मराठी विज्ञान परिषद अमरावती विभागाचे अध्यक्ष प्रवीण गुल्हाने व हौसी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी दिली.
पृथ्वीपेक्षा गुरू ११.२५ पट मोठा
पृथ्वीपेक्षा गुरू हा ११.२५ पट मोठा आहे. रक्तरंगी ठिपका हे गुरूचे खास वैशिष्टय, ‘ग्रेट रेड स्पॉट’ या नावाने हा ठिपका ओळखला जातो. ४० हजार किमी लांब १४ हजार किमी रुंदीचा हा अवाढव्य ठिपका आहे. या ठिपक्याचे निरीक्षण केले असता ते एक प्रचंड चक्रीवादळ असल्याचे सहज लक्षात येईल. गुरूवर घोंघावणारे चक्रीवादळ एका विशिष्ट ठिकाणीच का निर्माण झाले, याचे कारण मात्र अजूनही अज्ञात असल्याचे गिरूळकर म्हणाले.