सावधान! चांदूर बाजारात १०० च्या नकली नोटा चलनात?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2022 10:52 AM2022-02-17T10:52:27+5:302022-02-17T10:55:12+5:30
या दोन्ही नोटा ए-फोर या कागदावर कलर प्रिंट केलेल्या असण्याची शक्यतेवरून शहरात नकली नोटा चलनात आणणारी टोळी सक्रिय असल्याच्या चर्चेला ऊत आला आहे.
अमरावती : चांदूर बाजार शहरात शंभराच्या एकाच क्रमांकाच्या दोन नोटा आढळून आल्या. त्यावर मधल्या हिरव्या तारेवर कोठेच रिझर्व्ह बँकेचे लघुरूप नव्हते. कागदाचा दर्जाही कमी प्रतीचा होता. या दोन्ही नोटा ए-फोर या कागदावर कलर प्रिंट केलेल्या असण्याची शक्यतेवरून शहरात नकली नोटा चलनात आणणारी टोळी सक्रिय असल्याच्या चर्चेला ऊत आला आहे.
OEV 018532 असा एकच क्रमांक दोन्ही नोटांवर आहे. एका पतसंस्थेच्या पिग्मी एजंटने या नोटा संकलित केल्या. त्यांच्याकडे त्या अज्ञात खातेदाराकडून आल्याचे कळते. या एजंटने आपल्याजवळील १०० च्या काही नोटा अन्य व्यावसायिकाला चिल्लर म्हणून दिल्या.
चिल्लर घेतलेल्या १०० च्या नोटा मोजत असताना सदर व्यावसायिकाच्या लक्षात या दोन नोटांचा बदल लक्षात आला. पडताळणीत त्या नोटा नकली असल्याचे दिसून आले. इतर कुणाचीही पुन्हा फसवणूक होऊ नये म्हणून या व्यावसायिकाने दोन्ही नोटा व्यवहारातून बाजूला ठेवल्या.