एकाच वेळी ८४ टेबलांवर मतमोजणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 10:36 PM2019-04-22T22:36:02+5:302019-04-22T22:36:32+5:30
लोकसभा निवडणुकीत मतदान झाल्यानंतर जिल्ह्याचा कौल कुणाला? याचा उलगडा २३ मे रोजी होईल. नेमानी गोडाऊनमध्ये एकाच वेळी सहा गोदामात विधानसभानिहाय प्रत्येकी १४ टेबलवर मतमोजणी केली जाणार आहे. यावेळी रॅण्डमली पाच व्हीव्हीपॅटमधील चिठ्यांची मोजणी होणार असून निकालास किमान १० तास लागण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : लोकसभा निवडणुकीत मतदान झाल्यानंतर जिल्ह्याचा कौल कुणाला? याचा उलगडा २३ मे रोजी होईल. नेमानी गोडाऊनमध्ये एकाच वेळी सहा गोदामात विधानसभानिहाय प्रत्येकी १४ टेबलवर मतमोजणी केली जाणार आहे. यावेळी रॅण्डमली पाच व्हीव्हीपॅटमधील चिठ्यांची मोजणी होणार असून निकालास किमान १० तास लागण्याची शक्यता आहे.
अमरावती लोकसभा निवडणुकीसाठी १८ एप्रिल रोजी ११ लाख चार हजार ९३६ मतदारांनी मतदान केले. देशात सात टप्प्यात निवडणुका होत असल्याने सर्व मतदारसंघांत निवडणूक पार पडल्यानंतर २३ मे रोजी सकाळी ८ वाजता सर्व मतदारसंघात मतमोजणीला सुरूवात होणार आहे. अमरावती मतदारसंघात सर्वप्रथम टपाली मतपत्रिका मोजल्या जातील. यामध्ये मतदान कर्मचारी व सर्व्हीस व्होटर्सचे मतदान राहील. नेमानी गोडाऊनमधील सहा गोदामांत विधानसभानिहाय इव्हीएम ठेवण्यात आले आहेत. तेथे प्रत्येक गोदामात विधानसभानिहाय मतमोजणी होईल. या मतमोजणीचे प्रमुख संबंधित एआरओ राहतील. यासाठी प्रत्येक गोदामात १४ म्हणजेच सहा विधानसभा मतदारसंघाचे एकूण ८४ टेबल राहतील. या टेबलवर त्या मतदारसंघाची पहिली फेरी पूर्ण होईल. या प्रक्रियेला किमान एक तास लागणार आहे. त्यानंतर एकूण इव्हीएमप्रमाणे सर्व फेऱ्या आटोपल्यानंतर रॅण्डमली पाच व्हीव्हीपॅटची निवड करून त्यामधील मतदान चिठ्ठ्यांची मोजणी करण्यात येऊन इव्हीएमच्या मतांशी पडताळणी करण्यात येणार आहे. या सर्व प्रक्रियेमुळे निकाल स्पष्ट झाला तरी जाहीर व्हायला वेळ लागणार आहे.
प्रत्येक टेबलवर दोन कर्मचारी
मतमोजणीसाठी एका विधानसभा मतदारसंघातील १४ टेबलवर प्रत्येकी दोन म्हणजेच सहा मतदारसंघांतील ८४ टेबलांवर १६८ कर्मचारी राहतील. यामध्ये एक सुपरव्हायझर व एक असिस्टंट असेल. तसेच किमान २० टक्के कर्मचारी राखीव राहणार आहेत. याव्यतिरिक्तही १०० अधिकारी व कर्मचारी या ठिकाणी प्रक्रियेत राहणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागाने दिली.
म्हणून मतमोजणीला विलंब
यावेळी प्रथमच व्हीव्हीपॅट यंत्रांचा वापर करण्यात आलेला आहे. इव्हीएमबाबत मतदारांचा संशय दूर करण्यासाठी आयोगाद्वारा यावेळी व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात आला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने प्रत्येकी पाच व्हीव्हीपॅटमधील चिठ्यांची पडताळणी करण्यात येणार आहे. एका फेरीतील सर्व मतांची मोजणी झाल्याशिवाय पुढील फेरी मोजण्यात येणार नसल्यानेही निकाल जाहीर होण्यास विलंब लागण्याची शक्यता आहे.
मतमोजणीसंदर्भात प्राथमिक नियोजन झालेले आहे. आयोगाच्या सुचना आल्यास त्यामध्ये बदल होवू शकतो. विधानसभानिहाय १४ टेबलवर मतमोजणी होईल. प्रत्येक मतदारसंघातील पाच व्हीव्हीपॅटमधील चिठ्यांची देखील मोजणी करण्यात येईल
- शरद पाटील
उपजिल्हा निवडणूक अधिकारी