डीसीपी देणार ‘परी’च्या पंखाना बळ; क्षणात स्विकारले 'त्या' कन्येचे शैक्षणिक पालकत्व
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 03:29 PM2023-01-09T15:29:04+5:302023-01-09T15:35:37+5:30
तृतीयपंथीय संमेलनात एका दाम्पत्याने नऊ महिन्याचे बाळ केले स्वाधीन
अमरावती : शहरातील धर्मदाय कॉटन फंड परिसरात तृतीयपंथीयांचे अखिल भारतीय मंगलमुखी संमेलन सुरु आहे. या संमेलनामध्ये जिल्ह्यातील एका दाम्पत्याने आपल्या ९ महिन्याचा बाळाला तृतीयपंथीयांच्या स्वाधीन केले. यासंदर्भातील माहिती आयोजकांनी पोलिस उपायुक्त विक्रम साळी यांना दिली. यावेळी विक्रम साळी यांनी या चिमुकलीच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्विकारात मानवतेचा परिचय दिला आहे.
अमरावतीत पहिल्यांदाच राष्ट्रीयस्तरावरील तृतीयपंथीयांचे संमेलन होत आहे. १ ते १५ दरम्यान होणाऱ्या संमेलनात विविध कार्यक्रमाचे अयोजन केले आहे. समाजामध्ये स्त्री, परुषांप्रमाणे तृतीयपंथीयांनाही सन्मान मिळावा, त्यांनाही अधिकार मिळावे, संविधानाने दिलेल्या मतदानाचा अधिकार प्रमाणेच इतरही सुविधा मिळाव्या, तृतियपंथीयांचे आपसी मतभेद व इतर सामाजिक, आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी हे संमेलन होत असल्याची माहिती आयोजक सोना नायक व नेहा नायक यांनी दिली.
या संमेलनाला गत काही दिवसांपूर्वी पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी भेट देत संमेलनाची पाहणी केली. दरम्यान आयोजकांशी चर्चा करीत असताना त्यांचे लक्ष एका बाळावर गेले. यासंदर्भात त्यांनी माहिती घेतली असता, या चिमुकलीला अमरावतीमधील एक दाम्पत्याने आयोजकांकडे स्वाधीन केल्याची माहिती समोर आली. या चिमुकलीची संपूर्ण जबाबदारी तृतीयपंथींनी स्वीकारली असून तिचे नाव ‘परी’ ठेवण्यात आले आहे. दरम्यान, पोलीस उपायुक्त साळी यांनी मानवतेचा परिचय देत या कन्येच्या शिक्षणाच्या संपूर्ण खर्चाची जबाबदारी स्वीकारली, हे विशेष.
अनेक चिमुकले मदतीच्या प्रतीक्षेत
आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूरमध्येही अशाच प्रकारे तीन बाळांना त्यांच्या आई-वडीलांनी सोपविले आहे. अमरावती, गुजरात, पंजाबसह इतरही राज्यातही अनेक चिमुकल्याचे आई-वडील त्यांना सोडून गेले आहेत. परंतु त्यांच्या भविष्याचा विचार मात्र कोणी करत नाही. समाजाने ठरविले तर या चिमुकल्यांना चांगले शिक्षण देऊन त्यांचे भविष्य उज्वल करता येते. सरकार आणि समाजाने तृतीयपंथीयांना वाईट वागणूक न देता सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.