अबब, कोर्टातील लिपिक २०० रुपयांची लाच घेताना ‘ट्रॅप’
By प्रदीप भाकरे | Published: June 6, 2024 05:08 PM2024-06-06T17:08:04+5:302024-06-06T17:08:36+5:30
गाडगेनगर पोलिसांत गुन्हा : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
अमरावती: वारसाहक्क प्रमाणपत्राबाबतचे कागदपत्र नक्कल विभागात पाठवण्याकरिता २०० रुपये लाचेची मागणी करून ती घेणाऱ्या न्यायालयीन वरिष्ठ लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ४ जून रोजी सायंकाळी ५.४२ ते सहाच्या दरम्यान येथील चौथे सहदिवाणी न्यायाधिश, ज्युनिअर डिव्हिजन येथे तो ट्रॅप यशस्वी करण्यात आला. त्याने पंचासमक्ष लाच स्विकारली. संजय रामकृष्ण वाकडे (५१, वनश्री कॉलनी,दस्तुरनगर, अमरावती) असे लाचखोर न्यायालयीन कर्मचाऱ्याचे नाव आहे.
याप्रकरणी ३५ वर्षीय फिर्यादी वकीलाच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी आरोपी वरिष्ट लिपिक संजय वाकडे याच्याविरूध्द ५ जून रोजी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल केला. यातील फिर्यादी हे व्यवसायाने वकील असून, ते चांदुरबाजार, अचलपूर व अमरावती न्यायालयात वकीली करतात. त्यांचे पक्षकार मनोज वानखडे (रा. अमरावती) यांनी त्यांना चौथ्या सहदिवाणी न्यायाधीश, ज्युनियर डिव्हीजन अमरावती यांच्या न्यायालयात निकाल लागलेले आरएमजे वारसा हक्क प्रमाणपत्र प्रकरणाची सत्यप्रत काढण्यासाठी अर्ज करण्यासाठी सांगितले होते. ते पक्षकाराचे वारसा हक्काचे कागदपत्र मिळविण्याकरीता न्यायालयातील वरिष्ट लिपिक वाकडे याच्याकडे आले असता त्यांनी ते प्रकरण नक्कल विभागात पाठविण्याकरीता २०० रुपये लाच रकमेची मागणी केली. त्याचबरोबर फिर्यादी वकीलांनी त्याबाबत एसीबीकडे तक्रार केली. तक्रारीनसुार, ४ जून रोजी सायंकाळी सापळा रचण्यात आला. तथा लिपिक वाकडे याला २०० रुपये लाच घेताना पकडण्यात आले.
यांनी केली कारवाई
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधिक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक मंगेश मोहोड यांच्या नेतृत्वात पोलीस अंमलदार युवराज राठोड, शैलेश कडू, नितेश राठोड, उपेंद्र थोरात व गोवर्धन नाईक यांनी हा ट्रॅप यशस्वी केला. कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन एसीबीने केले आहे.