कर्मचाऱ्यांच्या बदली विरोधात तक्रार न्यायालयाने फेटाळली
By Admin | Published: March 27, 2016 12:07 AM2016-03-27T00:07:35+5:302016-03-27T00:07:35+5:30
राज्य परिवहन महामंडळाच्या बदली झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बदली विरोधात तक्रार औद्योगिक न्यायालयाने फेटाळून लावत परिवहन महामंडळाच्या बाजूने निकाल दिला.
निर्णय जाहीर : परिवहन महांडळाची बाजू भक्कम
मोर्शी : राज्य परिवहन महामंडळाच्या बदली झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बदली विरोधात तक्रार औद्योगिक न्यायालयाने फेटाळून लावत परिवहन महामंडळाच्या बाजूने निकाल दिला.
येथील एसटी आगारात जय इंगोले आगार व्यवस्थापक म्हणून रुजू झाल्यावर त्यांनी वाहतूकीसह कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त लावण्यासोबतच आर्थिक उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न सुरू केला होता. त्यांच्या या प्रयत्नामुळे महामंडळाचे कर्मचारी विशेषत: वाहक मोठ्या प्रमाणात दुखावले गेले आणि त्यांनी आगार व्यवस्थापकाविरुध्द आंदोलन केले होते. प्रकरण चिघळून प्रवाशांची गैरसोय होऊ नये या हेतूने महामंडळाने जयकुमार इंगोले यांची आगार व्यवस्थापक म्हणून दर्यापूरला तर दहा कर्मचाऱ्यांची प्रशासकीय कारणास्तव अमरावती विभागात वेगवेगळया आगारात बदली केली होती.
बदली विरोधात दहा कर्मचाऱ्यांनी अमरावतीच्या औद्योगिक न्यायालयात अंतरिम स्थगनादेश मिळावा म्हणून प्रकरण दाखल केले होते. २७ जुलै रोजी न्यायालयाने त्यांचा अर्ज खारीज केला होता. त्याविरुध्द या कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयात (रीट पीटिशन) याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने याप्रकरणी औद्योगिक न्यायालयाने ६ महिन्यांच्या आत या प्रकरणाचा निपटारा करण्याचे शिवाय तोपर्यंत एसटी महामंडळाने बदली झालेल्या कर्मचाऱ्यांची पदे रिक्त ठेवण्याचे निर्देश ३१ आॅगस्ट रोजी दिले होते.
औद्योगिक न्यायालयाने कर्मचाऱ्यांची बाजू ऐकून दोन्ही बाजूचा युक्तिवाद आणि कागदोपत्री सादर केलेल्या पुराव्याच्या आधारे कर्मचाऱ्यांची तक्रार फेटाळून लावली आहे.
जिल्ह्यातच या कर्मचाऱ्यांच्या बदल्या झालेल्या असताना आणि बदली झालेल्यांपैकी काही कर्मचारी तर कित्येक वर्षे मोर्शीलाच ठाण मांडून बसले होते, असे असताना बदली झाल्यानंतरही त्यांना मोर्शीचा मोह का आवरत नाही, हा प्रश्न मात्र येथे चर्चिल्या जात आहे. (शहर प्रतिनिधी)