कुमारिकेवर लादले मातृत्व, आरोपीला २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2022 06:24 PM2022-04-06T18:24:21+5:302022-04-06T18:31:02+5:30
याप्रकरणी वरूड पोलिसांनी २७ ऑगस्ट २०१९ रोजी बळीरामविरुद्ध बलात्कार व पोक्सोच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.
अमरावती : कुमारिकेवर अकाली मातृत्व लादणाऱ्या आरोपीला स्थानिक न्यायालयाने २० वर्षे सश्रम कारावास, १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक ४ एस. एस. सिन्हा यांनी ६ एप्रिल रोजी हा निर्णय दिला. बळीराम ऊर्फ गोलू भुजनसिंह युवनाते (३२, रा. बारगाव, ता. वरूड) असे शिक्षाप्राप्त आरोपीचे नाव आहे.
विधी सूत्रांनुसार, याप्रकरणी वरूड पोलिसांनी २७ ऑगस्ट २०१९ रोजी बळीरामविरुद्ध बलात्कार व पोक्सोच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. पीडित मुलीचे पोट वाढलेले दिसल्याने तिच्या आईने तिची डॉक्टरकडे नेऊन तपासणी केली. ती सहा ते सात महिन्यांची गर्भवती असल्याचे डॉक्टरने सांगितले. पीडिताला त्याबाबत विचारणा केली असता, आरोपी बळीरामने नोव्हेंबर २०१८ दरम्यान आपल्यावर अतिप्रसंग केल्याचे तिने सांगितले. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर २३ ऑक्टोबर २०१९ रोजी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सुनावणीदरम्यान सरकारी वकील मिलिंद जोशी यांनी एकूण पाच साक्षीदार तपासले.
पीडिताला मनोधैर्यमधून नुकसानभरपाई
पीडित मुलीने कालांतराने एका मुलीला जन्म दिला होता. आरोपी, पीडित मुलगी व बाळाची डीएनए चाचणी करण्यात आली. त्यानुसार आरोपी बळीराम हाच नैसर्गिक पिता असल्याबाबत पुष्टी झाली. त्यामुळे अभियोग पक्षाने तपासलेले साक्षी पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने त्याला भादंविचे कलम ३७६ (२) (एन)(३) व पोक्सोअन्वये दोषी धरले. पीडिताला मनोधैर्य योजनेंतर्गत नुकसानभरपाई देण्याकरिता जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला निर्देशित केले. कोर्ट पैरवी कय्यूम सौदागर व पोलीस नाईक अरुण हटवार यांनी केली.