जिल्हा रुग्णालयातील बूथवर ‘कोव्हक्सिन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:12 AM2021-01-17T04:12:55+5:302021-01-17T04:12:55+5:30
अमरावती : जिल्ह्यातील चार केंद्रांवर कोविशिल्ड, तर जिल्हा रुग्णालयातील केंद्रावर मात्र कोव्हक्सिन या लसीचे डोज दिले जात आहेत. या ...
अमरावती : जिल्ह्यातील चार केंद्रांवर कोविशिल्ड, तर जिल्हा रुग्णालयातील केंद्रावर मात्र कोव्हक्सिन या लसीचे डोज दिले जात आहेत. या दोन्ही लसी सारख्याच आहेत, फक्त कंपनीचा फरक असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिली.
जिल्ह्यात भारत बायोटेक कंपनीच्या कोव्हॅक्सिन लसीचे दोन हजार डोज जिल्हा सामान्य रुग्णालयास १४ जानेवारीला प्राप्त झाले. या दोन्ही लसींची २ ते ८ अंश तापमानात साठवणूक केली जाते. जिल्ह्यात फक्त याच केंद्रावर कोव्हॅक्सिनची लस दिली जाणार आहे. याशिवाय अन्य चार केंद्रांवर कोविशिल्ड या लसीचे डोज दिले जात आहेत.
जिल्ह्यात १३ जानेवारीच्या रात्री सिरम इस्टिट्यूटच्या कोविशिल्डचे १६ हजार ७०० डोज प्राप्त झाले आहेत. त्याची साठवणूक जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या व्हॅक्सिन स्टोअरमध्ये करण्यात आली आहे. या लसीचे प्रत्येकी १०० डोस पीडीएमसी, अचलपूर उपजिल्हा रुग्णालय, तिवसा ग्रामीण रुग्णालय व अंजनगाव बारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शुक्रवारी पाठविण्यात येऊन शनिवारी लसीकरण करण्यात आले.
जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी जिल्ह्यात ५०० पैकी ४४० हेल्थ केअर वर्करना लसीकरण करण्यात आले.
कोट
लाभार्थींच्या मंजुरीनंतर ही लस देण्यात आली. दोन्ही लसी सारख्याच आहेत, फक्त कंपन्या वेगळ्या आहेत. कोविशिल्डच्या तुलनेत कोव्हॅक्सिनच्या चाचण्या थोड्या कमी झाल्या आहेत.
डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक